नशिराबाद पोलिसांची धडक कारवाई
जळगाव ( प्रतिनिधी ) – गेल्या काही दिवसांपासून दरोड्याच्या गुन्ह्यात फरार असलेल्या एका १८ वर्षीय तरुणाला जेरबंद करण्यात नशिराबाद पोलिसांना यश आले आहे. चेतन सूर्यभान पाटील (वय १८, रा. वरची आळी, नशिराबाद) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, त्याच्याकडून एक गावठी कट्टा आणि एक डमी कट्टा हस्तगत करण्यात आला आहे.



जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार २३ मार्च रोजी नशिराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीत विशेष ‘काँबिंग ऑपरेशन’ राबविण्यात येत होते. या मोहिमेदरम्यान सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता नारखेडे यांना खात्रीशीर गुप्त माहिती मिळाली की, दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार संशयित चेतन पाटील हा गावठी कट्ट्यासह बसस्थानक परिसरात वावरत आहे. मिळालेल्या माहितीची गांभीर्याने दखल घेत पोलिसांनी तात्काळ बसस्थानक परिसरात सापळा रचला.
रात्री ८:२० च्या सुमारास संशयित चेतन पाटील पोलिसांच्या जाळ्यात अडकला. त्याची झडती घेतली असता, त्याच्या ताब्यातून एक गावठी कट्टा आणि एक बनावट (डमी) कट्टा जप्त करण्यात आला. याप्रकरणी आरोपीविरुद्ध नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस प्रशासन करत आहे.









