धरणगाव तालुक्यात खळबळ
धरणगाव (प्रतिनिधी):- मोबाईल आणि पैशांच्या वादातून एका ३५ वर्षीय तरुणाची चाकू, काठी आणि दगडाने ठेचून निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना बांभोरी शिवारात घडली आहे. या प्रकरणी धरणगाव पोलिसांनी संशयित आरोपीला अटक केली असून परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.


पिंटू अमशा बारेला (वय ३५, मूळ रा. वरला, जि. बडवानी, सध्या रा. बांभोरी शिवार) आणि संशयित आरोपी सुनील सिताराम बारेला यांच्यात पैशांच्या आणि मोबाईलच्या देवाणघेवाणीवरून वाद झाला होता. आरोपीने आपले पैसे आणि मोबाईल पिंटू याच्याकडे मागितले असता त्यांच्यात बाचाबाची झाली. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. २२ मार्च रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास बांभोरी शिवारातील रेल्वे लाईनजवळील पुलाच्या बोगद्यात आणि लिंबाच्या झाडाखाली आरोपीने पिंटू याला चाकू, काठी आणि दगडाने बेदम मारहाण केली. या गंभीर मारहाणीत पिंटूचा जागीच मृत्यू झाला.
भांडण सोडवण्यासाठी मृताची पत्नी सखूबाई बारेला आणि साक्षीदार कैलास बारेला हे गेले असता, आरोपीने सखूबाई यांचा उजवा हात पिरगळून त्यांना चापटबुक्क्यांनी मारहाण केली. याप्रकरणी सखूबाई बारेला यांनी धरणगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलीस कारवाई
घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब घोलप, पोलीस निरीक्षक सुनील पवार यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. धरणगाव पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
सदर प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत कंडारे करत असून, पोलिसांनी तत्परता दाखवत संशयित आरोपी सुनील सिताराम बारेला याला २३ मार्च रोजी रात्री ९:२४ वाजता अटक केली आहे.









