१ लाख ७८ हजारांचा ऐवज लंपास
धरणगाव (प्रतिनिधी):- शहरांमधील संताजी नगर भागात भरवस्तीत चोरट्यांनी दोन बंद घरांचे कडेकोंडे तोडून सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह रोख रकमेवर डल्ला मारला आहे. २१ मार्चच्या रात्री ते २२ मार्चच्या सकाळच्या दरम्यान ही घटना घडली असून, याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


धरणगाव येथील संताजी नगर (पटेल बेकरी समोर) भागात राहणाऱ्या तक्रारदार अरुणाबाई भाऊराव शिंदे (वय ६५) आणि त्यांच्या घरासमोर राहणाऱ्या साक्षीदार उषाबाई ईश्वरलाल चौधरी हे दोघे बाहेरगावी गेले होते. घराला कुलूप असल्याचे पाहून अज्ञात चोरट्यांनी संधी साधली. दि. २१ मार्च रोजी रात्री ११ वाजेपासून ते २२ मार्च रोजी सकाळी ८:३० वाजेच्या दरम्यान चोरट्यांनी या दोन्ही बंद घरांच्या दरवाजाचे कडी-कोंडे तोडून आत प्रवेश केला. घरातील सुटकेस आणि कपाटातील साहित्य अस्ताव्यस्त फेकून मौल्यवान ऐवज लंपास केला.
चोरट्यांनी दोन्ही घरातून एकूण १,७८,५०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला आहे. या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब घोलप आणि धरणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील पवार यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
याप्रकरणी अरुणाबाई शिंदे यांच्या फिर्यादीवरून धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संतोष काशिनाथ पवार करत आहेत.









