भुसावळमधील धक्कादायक घटना
भुसावळ ( प्रतिनिधी ):- स्वजातीत लग्न करूनही प्रेम विवाहाच्या वादातून एका तरुणाला विवस्त्र करून, खांबाला बांधून लोखंडी रॉड आणि दगडाने अमानुष मारहाण केल्याची खळबळजनक घटना भुसावळ तालुक्यात घडली आहे. तरुणाची नग्न अवस्थेत गावभर धिंड काढल्याप्रकरणी या प्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी पाच संशयितांना अटक केली आहे. न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.


एका गावातील तरुण आणि तरुणीने १८ मार्च २०२६ रोजी नाशिक येथे प्रेमविवाह केला होता. लग्नानंतर १९ मार्च रोजी त्यांनी भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात हजर राहून आपल्या विवाहाची माहिती दिली. त्यानंतर हे जोडपे तरुणाच्या मामाच्या घरी मुक्कामाला गेले होते. २० मार्च रोजी तरुणीच्या नातेवाईकांसह १० ते १२ जणांनी तरुणाच्या मामाच्या घरावर हल्ला केला. त्यांनी तरुणीला मारहाण करत तेथून पळवून नेले. त्यानंतर संशयितांनी तरुणाला विवस्त्र करून एका खांबाला बांधले आणि लोखंडी रॉड व दगडांनी बेदम मारहाण केली. इतक्यावरच न थांबता संशयितांनी पीडित तरुणाला दुचाकीवरून त्याच्या गावातील घरापर्यंत नेले आणि तिथेही त्याला मारहाण केली.
तसेच त्याच्या आई-वडिलांना घर जाळून टाकण्याची धमकी दिली. या अमानुष मारहाणीत तरुण गंभीर जखमी झाला असून त्याचा हात फ्रॅक्चर झाला आहे. त्याला उपचारासाठी जळगाव शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी या प्रकरणी कारवाई करत संशयितांना अटक केली आहे.
यात कोमल प्रकाश पाटील (२४), विजय नरोत्तम पाटील (५२), हेरंब महेश चौधरी (१९), ज्ञानेश्वर भास्कर भोई (१९), संजय सोनू बढे (६१) असे आरोपींची नावे आहेत. घटनेचे गांभीर्य ओळखून अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि विभागीय पोलीस अधिकारी केदार बारबोले यांनी घटनास्थळी भेट दिली. त्यांनी संपूर्ण घटनेची माहिती घेऊन तपासाबाबत कडक सूचना दिल्या आहेत. बाजारपेठ पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.










