जळगाव महापालिकेच्या २३ व्या स्थापना दिनानिमित्त माजी महापौरांचे भावपूर्ण सन्मान
‘माझा जळगाव, स्वच्छ जळगाव’ चर्चासत्रात स्वयंसेवी संस्थांचा उत्स्फूर्त सहभाग
जळगाव (प्रतिनिधी):- जळगाव शहर महानगरपालिकेच्या २३ व्या स्थापना दिनानिमित्त महापौर दीपमाला काळे यांच्या संकल्पनेतून महापालिकेच्या इतिहासात प्रथमच महापालिकेच्या माजी महापौरांचा भावपूर्ण सन्मान करण्यात आला. तसेच, ‘माझ जळगाव, स्वच्छ जळगाव’ या विषयावर भव्य परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. परिसंवादामध्ये विविध स्वयंसेवी संघटनांनी सहभागी होऊन सूचना मांडल्या.


या कार्यक्रमाला महापौर दीपमाला काळे, उपमहापौर मनोज चौधरी, स्थायी समिती सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील, आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे, महिला व बालकल्याण समिती सभापती सिंधुताई कोल्हे, उपायुक्त धनश्री शिंदे, सभागृह नेते नितीन लढ्ढा आणि नगरसचिव सतीश शुक्ला यांची प्रमुख उपस्थिती होती.
स्थापना दिनाचे औचित्य साधून महानगरपालिकेच्या प्रथम महापौर आशाताई कोल्हे यांच्यासह माजी महापौर सदाशिवराव ढेकळे, विष्णू भंगाळे, राखी सोनवणे, नितीन लढ्ढा आणि भारती सोनवणे यांचा महापौर व उपमहापौरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच, महापालिका प्रशासनाच्या वतीने विद्यमान महापौर दीपमाला काळे यांचाही गौरव करण्यात आला.
महापौरांचे ‘स्वच्छता व्हिजन’
परिसंवादादरम्यान बोलताना महापौर दीपमाला काळे यांनी जळगावला स्वच्छ बनवण्यासाठी आपले व्हिजन मांडले. त्या म्हणाल्या, इंदौरच्या धर्तीवर आपले शहर स्वच्छ करण्यासाठी लोकसहभागातून प्रयत्न केले जाणार आहेत. स्वच्छ शहराच्या रँकिंगमध्ये आपले जळगाव येण्यासाठी सर्वांचे सहकार्य महत्त्वाचे आहे. शहर सुंदर करण्यासाठी केवळ प्रशासन नव्हे, तर प्रत्येक नागरिकाचा आणि सामाजिक संस्थांचा सक्रिय सहभाग अनिवार्य आहे, असेही त्यांनी सांगितले.
सामाजिक संस्थांच्या आग्रही सूचना
परिसंवादात शहरातील विविध सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधींनी जळगावच्या स्वच्छतेबाबत महत्त्वाच्या सूचना केल्या. यामध्ये रोटरी संस्थेच्या विविध शाखा, लायन्स क्लब सुधर्मा संस्था, इंडियन मेडिकल असोसिएशन, केमिस्ट असोसिएशन, जैन महिला मंडळ, सीए असोसिएशन,ज्येष्ठ नागरिक संघ, सुरभी महिला मंडळ, जळगाव सायकलिस्ट ग्रुप, जळगाव रनर्स ग्रुप, माझे शहर माझे जळगाव ग्रुप, एडवोकेट बार असोसिएशन, क्रेडाई, धर्माधिकारी प्रतिष्ठान आदी संस्थांनी सहभाग घेतला. प्लास्टिकचा कचरा मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे शहरात प्लास्टिक मुक्ती आवश्यक आहे. कापडी पिशव्यांच्या वापरासाठी व्यापक मोहीम राबवावी. महामार्गालगत व्यवसाय करणाऱ्या हॉकर्सना शहरात पर्यायी जागा देऊन वाहतूक सुरळीत करावी. कचरा वेचणाऱ्या महिलांना आवश्यक साधने देऊन त्यांना ‘स्वच्छता दूत’ म्हणून ओळख द्यावी. शहरात प्रभागांसाठी ‘बेस्ट वॉर्ड’ स्पर्धा सुरू करून सन्मानित करावे.
गोलाणी मार्केटमधील अस्वच्छता, उघड्या गटारीमुळे होणारा कचरा देखील अस्वच्छता पसरवतो आणि घंटागाडीतून रस्त्यावर पडणाऱ्या कचऱ्याकडे कर्मचाऱ्यांनी लक्ष द्यावे अशा सूचना यावेळी नागरिकांनी केल्या. महापौर दीपमाला काळे यांनी या सर्व सूचनांची दखल घेत भविष्यात लोकसहभागातून स्वच्छ जळगाव साकारण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नगरसचिव सतीश शुक्ला यांनी केले, तर आभार प्रदर्शन ॲड. शुचिता हाडा यांनी केले. या प्रसंगी मोठ्या संख्येने नगरसेवक, अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.









