चाळीसगावच्या शेतकऱ्याला गंडा
जळगाव (प्रतिनिधी) – मोबाईल क्रमांक हॅक करून बँक खात्यातून परस्पर पैसे वळवण्याचे सत्र सुरूच असून, चाळीसगाव तालुक्यातील एका तरुण शेतकऱ्याला तब्बल ५ लाख ४९ हजार ४०१ रुपयांचा ऑनलाईन गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी जळगाव येथील सायबर पोलीस ठाण्यात अज्ञात सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महेश ईश्वरा जामदार (वय ३१, रा. मु.पो. पाटणा, ता. चाळीसगाव, जि. जळगाव) हे शेती करून आपला उदरनिर्वाह करतात. त्यांचे सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या चाळीसगाव स्टेशन रोड शाखेत सेव्हिंग खाते आहे. दि. २१ फेब्रुवारी ते २७ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत अज्ञात इसमाने महेश यांचा बँक खात्याशी लिंक असलेला मोबाईल क्रमांक हॅक केला.
संशयित आरोपीने मोबाईलचा ताबा मिळवून त्याद्वारे बँक खात्यात प्रवेश केला. त्यानंतर वेळोवेळी वेगवेगळ्या बँक खात्यांवर एकूण ५ लाख ४९ हजार ४०१ रुपये ट्रान्सफर करून जामदार यांची आर्थिक फसवणूक केली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महेश जामदार यांनी सायबर पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली.
या फिर्यादीवरून जळगाव सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सायबर पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक सतीश गोराडे करीत आहेत. अद्याप याप्रकरणी कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.
आपला मोबाईल क्रमांक किंवा बँकेशी संबंधित ओटीपी (OTP) कोणाशीही शेअर करू नका. संशयास्पद लिंकवर क्लिक करणे टाळावे आणि फसवणूक झाल्यास तातडीने ‘१९३०’ या हेल्पलाईन क्रमांकावर किंवा सायबर पोलिसांशी संपर्क साधावा.









