पाचोरा शहरात धडक कारवाई
जळगाव (प्रतिनिधी):- शासनाने ठरवून दिलेल्या किमतीपेक्षा जास्त पैसे घेऊन स्टॅम्प पेपरची विक्री करणे एका स्टॅम्प वेंडरला महागात पडले आहे. पाचोरा येथील एका स्टॅम्प वेंडरने ५०० रुपयांच्या १० स्टॅम्प पेपरसाठी ५,५०० रुपयांची मागणी केली, त्यापैकी ५०० रुपये लाच स्वीकारताना त्याच्या भावासह लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले.

तक्रारदाराला वैयक्तिक कामासाठी ५०० रुपये दराचे १० स्टॅम्प पेपर हवे होते. दि. १५ मार्च २०२६ रोजी ते पाचोरा येथील जामनेर रोडवरील ‘प्रशांत झेरॉक्स’ येथे गेले असता, अधिकृत स्टॅम्प वेंडर योगेश ईश्वरलाल संघवी याने ५०० रुपयांच्या एका स्टॅम्पची किंमत ५५० रुपये सांगितली. शासकिय नियमानुसार ५०० रुपये किंमत असताना ५० रुपये जादा का घेता, असे विचारले असता संघवी याने ५५० रुपयेच लागतील असे ठणकावून सांगितले. तक्रारदाराची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी १७ मार्च २०२६ रोजी जळगाव एसीबी विभागाकडे तक्रार नोंदवली.
मिळालेल्या तक्रारीनुसार, एसीबीच्या पथकाने १७ मार्च रोजी पडताळणी केली. यावेळी स्टॅम्प वेंडर योगेश संघवी याने १० स्टॅम्पचे ५,००० रुपये होत असताना ५,५०० रुपयांची मागणी केली. या व्यवहारातील अधिकची ५०० रुपयांची लाच रक्कम योगेशचा भाऊ प्रशांत ईश्वरलाल संघवी याने पंचासमक्ष स्वीकारली. लाच स्वीकारताच पथकाने दोघांना ताब्यात घेतले असून त्यांच्यावर पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक भारत तांगडे, अपर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी, सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. जळगाव एसीबीचे पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या पर्यवेक्षणाखाली पोलीस निरीक्षक हेमंत नागरे, बाळु मराठे आणि भूषण पाटील यांच्या पथकाने हा सापळा यशस्वी केला. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक स्मिता नवघरे करत आहेत.









