अमळनेर तालुक्यात दाजीबा नगरात घटना
अमळनेर (प्रतिनिधी)- भरधाव वेगाने येणाऱ्या अज्ञात वाहनाने धडक दिल्याने ६५ वर्षीय वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. अमळनेर शहरातील दाजीबा नगर परिसरात दि. १५ रोजी रात्री सुमारे ९ वाजेच्या सुमारास हा अपघात झाला.

मृत महिलेचे नाव शोभाबाई जयवंतराव पाटील (वय ६५) असे असून त्या रात्री जेवणानंतर परिसरात शतपावली करत होत्या. यावेळी गळवाडेच्या दिशेने भरधाव वेगाने येणाऱ्या एका वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली. या धडकेमुळे त्या रस्त्यावर कोसळल्या. घटना घडताच वाहनचालकाने थांबण्याऐवजी वाहन माघारी वळवून घटनास्थळावरून पळ काढला. दरम्यान, परिसरातील नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमी अवस्थेतील शोभाबाई पाटील यांना उपचारासाठी दवाखान्यात दाखल केले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले.
या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. अपघातानंतर वाहनचालक फरार झाल्याने पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला आहे. याप्रकरणी प्रदीप आत्माराम पाटील यांनी अमळनेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास हेडकॉन्स्टेबल चंद्रकांत पाटील करीत आहेत.









