भुसावळ तालुक्यातील खड्का शिवारातील घटना
भुसावळ (प्रतिनिधी) :-विहिरीचे काम करत असताना अंगावर दगड कोसळून गंभीर जखमी झालेल्या एका ४२ वर्षीय मजुराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. ही घटना भुसावळ तालुक्यातील खडका शिवारात घडली असून, छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली.

तुळशीराम यदुबा दांडगे (वय ४२, रा. अन्वी, ता. सिल्लोड, जि. छत्रपती संभाजीनगर) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. दि. २८ फेब्रुवारी रोजी दुपारी ४:३० वाजेच्या सुमारास तुळशीराम दांडगे हे भुसावळ तालुक्यातील खडका शिवारात एका विहिरीचे काम करत होते. काम सुरू असताना अचानक त्यांच्या डोक्यावर दगड पडल्याने ते गंभीर जखमी झाले. घटनेनंतर त्यांचे नातेवाईक मंगेश संतोष दांडगे यांनी त्यांना तातडीने उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात दाखल केले.
मात्र, त्यांची प्रकृती खालावत गेली आणि दि. १ मार्च रोजी दुपारी १२:१५ वाजेच्या सुमारास डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल मनोज येऊलकर करीत आहे.









