२०४० उमेदवारांची उपस्थिती
जळगाव (प्रतिनिधी):- जळगाव जिल्हा पोलीस दलाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या पोलीस शिपाई भरती प्रक्रियेतील अत्यंत महत्त्वाचा टप्पा असलेली ‘लेखी परीक्षा’ आज, १५ मार्च २०२६ रोजी यशस्वीरित्या पार पडली. अत्यंत कडक पोलीस बंदोबस्त आणि पारदर्शक वातावरणात पार पडलेल्या या परीक्षेत ९७ टक्क्यांहून अधिक उमेदवारांनी आपली उपस्थिती नोंदवली.

जिल्हा पोलीस दलाच्या आस्थापनेवरील रिक्त १७१ जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. मैदानी चाचणीत पात्र ठरलेल्या एकूण २०९६ उमेदवारांना लेखी परीक्षेसाठी बोलावण्यात आले होते. जळगाव येथील एम.जे. कॉलेज या केंद्रावर सकाळी ११.०० ते दुपारी १२.३० या वेळेत ही परीक्षा घेण्यात आली.
महत्वाची आकडेवारी
एकूण पात्र उमेदवार: २०९६
हजर उमेदवार: २०४०
गैरहजर उमेदवार: ५६
उपस्थितीची टक्केवारी: ९७.३३%
डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली ही संपूर्ण प्रक्रिया राबविण्यात आली. कोणताही गैरप्रकार टाळण्यासाठी केंद्रावर चोख तांत्रिक अंमलबजावणी आणि कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. विशेष म्हणजे, संपूर्ण परीक्षा कालावधीत कुठेही अनुचित प्रकार घडला नाही, अशी माहिती प्रशासनातर्फे देण्यात आली आहे. लेखी परीक्षेचा निकाल आणि अंतिम निवड यादी लवकरच जळगाव पोलीस दलाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे. ही भरती प्रक्रिया पूर्णपणे गुणवत्ता आणि पारदर्शकतेवर आधारित असून, उमेदवारांनी कोणत्याही अफवांना किंवा आमिषांना बळी पडू नये, असे आवाहन जिल्हा पोलीस प्रशासनाने केले आहे.








