महादेव हॉस्पिटलमध्ये परिसंवाद संपन्न
जळगाव ( प्रतिनिधी ) – शहरातील महादेव हॉस्पिटल येथे गुरुवार, दि. १२ मार्च रोजी ‘सिस्टेमिक ल्युपस एरिथेमॅटोसस’ या गंभीर व जुनाट आजारावर विशेष परिसंवाद आणि मार्गदर्शन सोहळा उत्साहात पार पडला. याप्रसंगी संधिवात तज्ज्ञ डॉ. आस्था अग्रवाल आणि ग्रंथीशास्त्र तज्ज्ञ डॉ. चिमु चिंते यांनी उपस्थितांना या आजाराचे स्वरूप, लक्षणे आणि आधुनिक उपचार पद्धतींबाबत सविस्तर माहिती दिली.

परिसंवादात मार्गदर्शन करताना डॉ. आस्था अग्रवाल व डॉ. चिमु चिंते यांनी सांगितले की, सिस्टेमिक ल्युपस एरिथेमॅटोसस हा एक ‘ऑटोइम्यून’ आजार आहे. यामध्ये शरीरातील रोगप्रतिकारशक्ती चुकून स्वतःच्याच निरोगी पेशींवर हल्ला करू लागते. सोप्या भाषेत सांगायचे तर, शरीराची ‘सुरक्षा यंत्रणा’ स्वतःच्याच अवयवांना शत्रू समजून त्यांच्यावर प्रहार करते. हा आजार ‘सिस्टेमिक’ असल्याने त्वचा, सांधे, किडनी, हृदय किंवा मेंदू अशा शरीराच्या कोणत्याही भागावर याचा परिणाम होऊ शकतो.
तज्ज्ञांनी ल्युपस ओळखण्यासाठी काही महत्त्वाची लक्षणे सांगितली. नाकाच्या पुलावर आणि दोन्ही गालांवर फुलपाखरासारखा लाल रंगाचा पुरळ येणे, सांध्यांमध्ये सूज येणे आणि सकाळी उठल्यावर सांधे जखडणे, विश्रांती घेऊनही न जाणारा प्रचंड थकवा आणि ताप येणे, सूर्यप्रकाशामुळे त्वचेवर पुरळ येणे, थंडीमुळे हातापायांची बोटे पांढरी किंवा निळी पडणे असे होत असेल तर उपचार सुरु केले पाहिजेत असे तज्ज्ञांनी सांगितले.
ल्युपस होण्याची नेमकी कारणे अद्याप पूर्ण स्पष्ट नसली तरी, अनुवांशिकता हे एक मोठे कारण असू शकते. विशेष म्हणजे, या आजाराचे ९०% रुग्ण हे स्त्रिया असतात, ज्यामध्ये ‘इस्ट्रोजेन’ या हार्मोनचा मोठा वाटा असल्याचे मानले जाते. याव्यतिरिक्त अतिनील किरण, संसर्ग किंवा काही औषधांमुळे हा आजार बळावू शकतो, असेही डॉक्टरांनी स्पष्ट केले. आजच्या काळात वैद्यकीय क्षेत्रात झालेल्या प्रगतीमुळे केवळ लक्षणे कमी करणे हे ध्येय नसून, आजार पूर्णपणे नियंत्रणात ठेवणे शक्य झाले आहे, असा विश्वास तज्ज्ञांनी व्यक्त केला.
या कार्यक्रमाप्रसंगी डॉ. सी. ए. कांते, डॉ. विनोद बाविस्कर, डॉ. सी. डी. सारंग, डॉ. रविंद्र पाटील, डॉ. तेजस खैरनार, डॉ. ओमप्रकाश काकडे, डॉ.आसावरी देशपांडे, डॉ. ऋषभ पाटील, डॉ. ललित कुमार, डॉ. स्वानंद झंवर, डॉ. रोहित कोळी यांच्यासह शहरातील इतर मान्यवर डॉक्टर्स आणि वैद्यकीय क्षेत्रातील प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.









