जामनेर तालुक्यातील फत्तेपूर येथील घटना
फत्तेपूर (जामनेर):- व्यापाऱ्याने विश्वासाने दिलेला लाखो रुपयांचा टरबूजाचा माल लंपास करून फसवणूक केल्याची घटना फत्तेपूर परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी फत्तेपूर पोलीस स्टेशनमध्ये ट्रक मालक आणि चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी श्रीमती जानकी राजाराम राव (वय ५२, रा. उडुपी, कर्नाटक; सध्या रा. बंगलोर) यांचा फळविक्रीचा व्यवसाय आहे. त्यांनी बिहार येथील मंडईत विक्रीसाठी ३,१६,००० रुपये किमतीचा टरबूजाचा माल एका ट्रकमध्ये भरला होता. हा माल सुरक्षितपणे पोहोचवण्यासाठी त्यांनी नॅशनल ट्रान्सपोर्टचा मालक तौसीफ आणि ट्रक क्रमांक आर जे-११, जीसी-३१२८ च्या चालकाकडे सोपवला होता.
दि. १ मार्च रोजी रात्री ९ वाजेपासून ते २ मार्चच्या सकाळी ९ वाजेदरम्यान, जामनेर तालुक्यातील फत्तेपूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या एच.पी. पेट्रोल पंपावरून हा माल घेऊन ट्रक मार्गस्थ झाला होता. मात्र, आरोपींनी हा माल बिहार येथे न पोहोचवता परस्पर लंपास केला. आपल्या मालाचा अपहार झाल्याचे लक्षात येताच जानकी राव यांनी फत्तेपूर पोलीस स्टेशन गाठले.
त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी ट्रक मालक तौसीफ आणि संबंधित ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास फत्तेपूर पोलीस स्टेशनचे पोलीस हेड कॉन्स्टेबल विनोद पाटील करत आहेत. ही कारवाई सपोनि अंकुश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे. या घटनेमुळे फळ व्यापाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून ट्रान्सपोर्ट विश्वासाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.









