रावेर शहरातील नवीन सावदा रोडवर घटना
रावेर (जळगाव):- शहरातील नवीन सावदा रोडवरील ‘न्यू बंटी ट्रेडर्स’ या घाऊक किराणा दुकानासमोरून अज्ञात चोरट्यांनी ३३ हजार रुपये किमतीचे सोयाबीन रिफाइंड तेलाचे तीन बॅरल चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी सोहनलाल किशोर गगनानी (वय ३६, रा. स्टेशन रोड, रावेर) यांचे नवीन सावदा रोडवरील लक्ष्मी गॅस एजन्सीसमोर ‘न्यू बंटी ट्रेडर्स’ नावाचे होलसेल किराणा दुकान आहे. २८ फेब्रुवारी रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास त्यांनी दुकान बंद केले होते. दरम्यान, २८ फेब्रुवारीच्या रात्री ते १ मार्च २०२६ च्या सकाळी १० वाजेच्या पूर्वी, दुकानासमोर असलेल्या मोकळ्या शेडमधून अज्ञात चोरट्यांनी ५४० किलो वजनाचे सोयाबीन तेलाचे ३ बॅरल लंपास केले. एकूण वजन: ५४० किलो, किंमत प्रत्येकी ११ हजार प्रमाणे एकूण ३३ हजार रुपये मुद्देमाल लंपास झाला आहे.
या प्रकरणी सोहनलाल गगनानी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक तुषार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक समाधान ठाकूर करत आहेत. भरवस्तीत झालेल्या या चोरीमुळे व्यापाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.









