७० हजारांचा ऐवज चोरीला
चाळीसगाव (प्रतिनिधी):- चाळीसगाव शहर बस स्थानकावर गर्दीचा फायदा घेऊन चोरट्यांनी दोन महिला प्रवाशांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी सोनाली योगेश मांडोळे (वय ३५, रा. खडकी, ता. चाळीसगाव) या १ मार्च रोजी सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेच्या सुमारास चाळीसगाव बस स्थानकावरून खडकी येथे जाण्यासाठी बसची वाट पाहत होत्या. याच दरम्यान, मालेगावला जाणाऱ्या बसमध्ये चढत असताना साक्षीदार रत्ना प्रवीणसिंग पवार यांच्यासोबत त्या गर्दीत होत्या. या गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने अत्यंत चालाखीने या दोन्ही महिलांच्या गळ्यातील सोन्याचे मणी आणि मंगळसूत्र लंपास केले.
एकूण ७०,००० रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरट्यांनी लंपास केले आहेत. या घटनेप्रकरणी सोनाली मांडोळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक अमितकुमार मनेळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल राहुल सोनवणे हे करत आहेत. बस स्थानकावरील वाढत्या चोरीच्या घटनांमुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, पोलिसांनी गस्त वाढवण्याची मागणी होत आहे.









