जळगाव (प्रतिनिधी):- डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालय, जळगाव येथे महान साहित्यिक कवी कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त मराठी राजभाषा दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शैलेश तायडे यांच्या हस्ते कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्प अर्पण करून त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. तसेच उपस्थितांना मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा देत भौगोलिक विभागानुसार मराठी कशी मजेशीर बदलत जाते हे आपल्या मनोगतात व्यक्त केले.या प्रसंगी राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यक्रम अधिकारी व सहाय्यक प्राध्यापिका डॉ. प्रीती दातीर यांनी आपल्या मनोगतातून कुसुमाग्रज यांचे मराठी साहित्य क्षेत्रातील भरीव योगदान अधोरेखित केले. मराठी भाषेचा अभिमान बाळगणे ही प्रत्येकाची जबाबदारी असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच त्यांनी कुसुमाग्रज यांची प्रसिद्ध ‘कणा’ ही कविता प्रभावी सादरीकरणातून सादर करून उपस्थितांची दाद मिळवली.विद्यार्थ्यांनी मराठी गीत सादर करून मराठी भाषेचा गौरव केला. संपूर्ण कार्यक्रमात मराठी भाषेच्या समृद्ध परंपरेचा आणि अभिमानाचा प्रत्यय आला.कार्यक्रमास सर्व प्राध्यापक, प्राध्यापिका, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.










