जळगावमध्ये विद्यार्थ्यांचा एल्गार!
जळगाव ( प्रतिनिधी ) – शैक्षणिक समस्यांचा पाढा वाचत आणि प्रलंबित मागण्यांसाठी ‘अखिल भारतीय विद्यार्थी परिषद’ (अभाविप) जळगाव शाखेच्या वतीने आज शहरात भव्य ‘विद्यार्थी न्याय क्रांती मोर्चा’ काढण्यात आला. शिवतीर्थ मैदानापासून निघालेल्या या मोर्चाने जिल्हाधिकारी कार्यालय दणाणून सोडले. “शिक्षण आमच्या हक्काचे, नाही कोणाच्या बापाचे” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.


या मोर्चात जिल्ह्यातील कला, वाणिज्य, विज्ञान, अभियांत्रिकी, आयटीआय, वैद्यकीय, नर्सिंग, कृषी आणि आयुर्वेद शाखेचे विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. शासनाने विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे सातत्याने दुर्लक्ष केल्याच्या निषेधार्थ हा हुंकार भरण्यात आला. मोर्चाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांना सादर केलेल्या निवेदनात प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत. अतिवृष्टीग्रस्त भागातील विद्यार्थ्यांचे स्पर्धा परीक्षा शुल्क माफ करावे आणि ऑनलाइन परीक्षांचे भरमसाठ शुल्क कमी करावे.
शासन निर्णयानुसार मुलींना पूर्ण शुल्क माफी द्यावी, केवळ ट्युशन फी माफ करून संभ्रम निर्माण करू नये. स्वाधार योजना, डॉ. पंजाबराव देशमुख निर्वाह भत्ता आणि पंडित दीनदयाल उपाध्याय योजनांची प्रलंबित शिष्यवृत्ती तात्काळ खात्यात जमा करावी. शासकीय वसतिगृहांची दुरवस्था थांबवून तिथे दर्जेदार भोजन आणि नूतनीकरण करावे. महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायदा २०१६ नुसार महाविद्यालयीन निवडणुका पुन्हा सुरू कराव्यात. रिक्त प्राध्यापक पदे भरावीत आणि इंटर्न डॉक्टरांच्या स्टायपेंडमध्ये वाढ करावी. जळगाव येथील शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयाच्या इमारतीचे काम त्वरित पूर्ण करून हक्काची जागा उपलब्ध करून द्यावी अशा मागण्या आहे.
यावेळी प्रदेश कार्यसमिती सदस्य गायत्री पाटील, जिल्हा संयोजक तेजस पाटील, महानगर सहमंत्री वरद पांढारकर, शारदा पाटील यांच्यासह जिल्ह्यातील पदाधिकारी आणि हजारो विद्यार्थी उपस्थित होते. जिल्हाधिकाऱ्यांमार्फत हे निवेदन मुख्यमंत्री आणि संबंधित मंत्र्यांना पाठवण्यात आले असून, त्वरित निर्णयाची मागणी करण्यात आली आहे.









