नवी मुंबई (वृत्तसंस्था) – अलिबाग, राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी आज निसर्ग चक्रीवादळाने नुकसान झालेल्या भागाची पाहणी केली. तसेच काही नुकसानग्रस्तांना आर्थिक मदतीच्या धनादेशाचे वाटपही केले.रायगड जिल्ह्यात निसर्ग चक्रीवादळाने मोठे नुकसान केले आहे.
या नुकसानीची पाहणी करण्यासाठी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आज (शनिवार 13 जून) जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी अलिबाग तालुक्यातील नागांव येथील नुकसानग्रस्त भागाला त्यांली भेट दिली. यावेळी पालकमंत्री आदिती तटकरे, आमदार महेंद्र दळवी, जिल्हाधिकारी निधी चौधरी, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप हळदे, पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर आदी उपस्थितीत होते. थोरात यांनी नागाव येथील नुकसानीची पाहणी केली.
तसेच वादळग्रस्त नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. यावेळी नागाव ग्रामपंचायतीमधील काही नुकसानग्रस्त नागरिकांना महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, पालकमंत्री आदिती तटकरे, आमदार महेंद्र दळवी यांच्या हस्ते नैसर्गिक आपत्ती नुकसान भरपाई म्हणून आर्थिक मदतीच्या धनादेशाचे वाटपही करण्यात आले. नागांवनंतर थोरात चौल, मुरुड तालुक्यातील काशिद येथील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. त्यानंतर मुरुड येथे अधिकाऱ्यांसमवेत चर्चा, श्रीवर्धनमधील दिघी बंदर, म्हसळ्यातील तुरुंबडी येथे नुकसानग्रस्त भागाला भेट दिली.