लग्नासाठी आले होते जळगावात
जळगाव : शहरात धावत्या गीतांजली एक्सप्रेसच्या धडकेत एका ६० वर्षीय अनोळखी वृद्धाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही घटना बुधवार, २५ फेब्रुवारी रोजी दुपारी १:३० वाजेच्या सुमारास बजरंग बोगद्याजवळ डाऊन लाईनवर घडली.

जळगाव शहरातील बजरंग बोगद्याजवळून जात असताना या वृद्धाला गीतांजली एक्सप्रेसने धडक दिली. या भीषण अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच लोहमार्ग पोलीस ठाण्याचे पोहेकॉ हिरालाल चौधरी यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी मृताची अंगझडती घेतली असता, त्यांच्या खिशात एक मोबाईल आणि एका बँकेची स्लिप मिळून आली.
मयत वृद्ध हे पुणे येथील रहिवासी होते. ते एका लग्नानिमित्त जळगावात आले होते. बँकेच्या स्लिपमुळे त्यांच्या नातेवाईकांचा शोध घेणे सुलभ झाले आहे. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केला आहे. मृताच्या नातेवाईकांना घटनेची माहिती देण्यात आली असून, ते जळगावच्या दिशेने रवाना झाले आहेत. लोहमार्ग पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.









