भाजप-शिवसेनेची बिनविरोध निवड निश्चित
जळगाव प्रतिनिधी – जळगाव शहर महानगरपालिकेच्या अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या स्थायी समिती आणि महिला व बालकल्याण समिती सभापती पदासाठी गुरुवारी (दि. २६ फेब्रुवारी) अर्ज दाखल करण्यात आले. दोन्ही पदांसाठी प्रत्येकी एकच अर्ज आल्याने ही निवड आता केवळ औपचारिकता उरली असून दोन्ही उमेदवार बिनविरोध निवडून येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.


स्थायी समिती सभापतीसाठी भारतीय जनता पक्षातर्फे डॉ. चंद्रशेखर शिवाजी पाटील यांचा एकमेव अर्ज दाखल झाला. तर महिला व बालकल्याण समिती सभापती म्हणून शिवसेनेतर्फे ज्येष्ठ नगरसेविका सिंधुताई विजय कोल्हे यांनी आपला उमेदवारी अर्ज सादर केला.
दोन्ही उमेदवारांनी आपले अर्ज नगरसचिव सतीश शुक्ला यांच्याकडे सुपूर्द केले.

अर्ज दाखल करताना महापालिकेतील राजकीय वातावरण उत्साहाचे होते. यावेळी भाजपतर्फे गटनेता प्रकाश बालानी, उपगटनेता नितीन बरडे, स्थायी समिती सदस्य दीपक सूर्यवंशी, विशाल भोळे, सुरेश सोनवणे, अरविंद देशमुख, कल्पेश सोनवणे, मानसी भोईटे, वंदना इंगळे, नितीन सपके तसेच महिला बालकल्याण समिती सदस्य सुरेखा तायडे, रंजना वानखेडे, पूजा जगताप, विद्या सोनवणे, गायत्री राणे, शिवसेनातर्फे जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, दिलीप पोकळे, नरेंद्र पाटील, गणेश सोनवणे तसेच समिती सदस्य प्रतिभाताई देशमुख, डॉ. अमृता सोनवणे यांच्यासह नगरसेवक प्रवीण कोल्हे, पियुष कोल्हे उपस्थित होते.

स्थायी समितीवर डॉ. चंद्रशेखर पाटील यांची वर्णी लागल्याने भाजप कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे, तर महिला व बालकल्याण समितीचे नेतृत्व अनुभवी सिंधूताई कोल्हे यांच्याकडे गेल्याने शिवसेनेच्या महिला आघाडीत उत्साह दिसून येत आहे. एकमेव अर्ज आल्याने आता केवळ अधिकृत घोषणेची प्रतीक्षा आहे.









