जळगाव पोलिसांची मोठी कामगिरी
जळगाव (प्रतिनिधी): जळगाव जिल्हा पोलीस दलाच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने एक अत्यंत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. सन २०१८ मध्ये एम.आय.डी.सी. पोलीस स्टेशन हद्दीतून अपहरण झालेल्या एका ९ वर्षीय मुलीचा तब्बल ८ वर्षांनंतर शोध घेण्यास पोलिसांना यश आले आहे.

जळगाव जिल्ह्यातील ४ महिने किंवा त्यापेक्षा अधिक काळ बेपत्ता असलेल्या मुला-मुलींचा शोध घेण्यासाठी पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष मोहीम राबवली जात आहे. या मोहिमेदरम्यान आदिवासी समाजातील अनेक मुले-मुली बेपत्ता असून त्यांची माहिती मिळणे कठीण होत असल्याचे समोर आले होते. या पार्श्वभूमीवर, तपास पथकाने गोपनीय बातमीदार, आदिवासी मेळावे, यात्रा आणि आठवडे बाजार या ठिकाणी शोध घेण्यास सुरुवात केली होती.
आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर ठरला मोलाचा
चोपडा तालुक्यातील कर्जाणे येथे होळीनिमित्त भरलेल्या ‘भोंगऱ्या’ बाजारात एक १५-१६ वर्षांची मुलगी एकटीच असल्याची माहिती पोलीस अंमलदार दीपक पाटील यांना मिळाली. त्या मुलीला स्वतःचे नाव किंवा पत्ता सांगता येत नव्हता. प्राथमिक तपासात तिचा चेहरा जुन्या प्रलंबित प्रकरणांमधील फोटोंशी जुळत नव्हता. मात्र, पोलीस उपनिरीक्षक दिनेश बडगुजर यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून, बेपत्ता मुली आजच्या काळात कशा दिसत असतील, याचे संभाव्य फोटो तयार केले. या तंत्रज्ञानामुळेच सन २०१८ मधील अपहृत मुलीची चेहरेपट्टी सध्याच्या मुलीशी जुळत असल्याचे निदर्शनास आले.
तपास पथकाची कार्यवाही
खात्री पटल्यानंतर सपोनि हरीदास बोचरे यांच्या नेतृत्वाखालील पोउपनि बडगुजर, विठ्ठल फुसे, दीपक पाटील, मनीषा पाटील, किरण धनगर आणि सलीम शेख यांनी तातडीने कर्जाणे येथे जाऊन मुलीचा शोध घेतला. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर या मुलीस एम.आय.डी.सी. पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि पोलीस उपअधीक्षक अरुण आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने केलेल्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.








