जळगाव ( प्रतिनिधी ) – गोदावरी व्यवस्थापन महाविद्यालयांच्यावतीने आज गॅस सुरक्षितता अभियान राबविण्यात आले. गॅस वापरातील धोके, अपघात टाळण्यासाठी घ्यावयाची काळजी व आपत्कालीन उपाययोजना याबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने शिक्षक व विद्यार्थ्यांच्या सहभागातून हा सामाजिक उपक्रम यशस्वीपणे पार पडला.
या अभियानांतर्गत खेडी परिसर ते कालिंका माता परिसरापर्यंत भव्य जनजागृती रॅली काढण्यात आली. रॅलीदरम्यान नागरिकांना गॅस सुरक्षिततेविषयी सुमारे दहा हजार माहितीपत्रकांचे वाटप करण्यात आले. कार्यक्रम सामाजिक बांधिलकी अंतर्गत आयोजित करण्यात आला असून दीडशे ते दोनशे विद्यार्थी उत्स्फूर्तपणे सहभागी झाले.रॅलीस प्रमुख पाहुणे म्हणून श्री. अश्वजीत घारडे (प्रभारी मुख्य अग्निशामन अधिकारी, जळगाव महानगरपालिका), श्री. भारत बारी (प्रभारी अग्निशामन केंद्र अधिकारी, जळगाव शहर), परिसरातील नगरसेवक श्री. प्रविण भाऊ कोल्हे तसेच संचालक डॉ. प्रशांत वारके यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले. त्यांनी घरगुती व व्यावसायिक गॅस वापरताना सुरक्षिततेचे नियम पाळण्याचे आवाहन केले.यावर्षी महाविद्यालयाने ‘गॅस सुरक्षितता’ हा ज्वलंत सामाजिक विषय निवडून नागरिकांमध्ये सजगता निर्माण करण्याचे नियोजन केले होते. या उपक्रमाचे आयोजन व नियोजन प्रा. चंद्रकांत डोंगरे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल उपस्थित मान्यवरांनी महाविद्यालयाच्या सामाजिक उपक्रमांचे कौतुक केले.










