पुणे (वृत्तसंस्था) –15 हजार रुपयांवरून झालेल्या वादातून पुण्यामध्ये इंजिनियरिंगच्या 3 विद्यार्थ्यांनी एका तरुणाचा खून केला. पुण्यातल्या कोंढवा भागात ही धक्कादायक घटना घडलीये.सागर चिलवेरी या तरुणाला कुल उत्सव सोसायटीच्या 11व्या मजल्यावरून ढकलून देण्यात आलं. यात या तरुणाचा जागीच मृत्यू झाला.या प्रकरणी कोंढवा पोलिसांनी अभिनव जाधव, अक्षय गोरडे आणि तेजस गुजर यांना अटक केलीये.या प्रकरणाचे तपास अधिकारी असणाऱ्या कोंढवा पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक (गुन्हे) महादेव कुंभार यांनी बीबीसी मराठीला सांगितलं, “हे तिघंही इंजिनियरिंगचे विद्यार्थी आहेत. ज्याचा मृत्यू झाला तो सागर चिलवेरी इव्हेंट मॅनेजमेंटचं काम करायचा. या तिघांपैकी अभिनव जाधव याने 9 जानेवारीला सागरला 15,000 रुपये 10 टक्के व्याजाने दिले होते. शिवाय या तीनपैकी दोन मुलं आणि सागर हे मार्चपासून एकाच खोलीत रहात होते.”अभिनव आणि सागरमध्ये पैशांच्या परतफेडीवरून वाद सुरू होता. सागर चिलवेरी स्वारगेट भागात गेलेला असताना या तिघांनी मोटरसायकलवरून जाऊन त्याचा शोध घेतला आणि त्याला बळजबरीने कुल उत्सव सोसायटीत आणलं.एकाच मोटरसायकलवर बसून रात्री दीड वाजताच्या सुमारास हे चौघे परतले.सोसायटीमध्ये या तीन तरुणांनी सागरला मारहाण केल्याचं पोलिसांच्या FIRमध्ये म्हटलंय. वॉचमनसमोरही या मुलांची भांडणं झाल्याचं पोलीस निरीक्षक कुंभार यांनी सांगितलं. हे तिघेजण आपल्याला पुन्हा मारहाण करतील, अशी सागरला भीती होती. मारहाण करणार नसल्याचा शब्द अभिनव, अक्षय आणि तेजस यांनी दिल्यानंतर सागर त्यांच्यासोबत इमारतीत वर गेला. पण खोलीतही या सगळ्यांमध्ये भांडणं झाली.या मुलांच्या खोलीतून भांडणं ऐकू आल्यानंतरही वॉचमनने त्यांना खाली आणून त्यांची समजूत घातली आणि त्यांना मग परत वर पाठवलं.10 मार्चला रात्री सव्वा दोन – अडीचच्या दरम्यान अभिनव जाधव याने सागर चिलवेरीला डक्टमधून 11व्या मजल्यावरून ढकलून दिलं. यात सागरचा जागीच मृत्यू झाला.कुल उत्सव सोसायटीच्या समोर असणाऱ्या पुणे महापालिकेच्या गोदामाचे वॉचमन – ओंकार येनपुरे या प्रकरणातले साक्षीदार आहे.या वॉचमनच्या तक्रारीवरून कारवाई करत कोंढवा पोलिसांनी अभिनव जाधव, अक्षय गोरडे आणि तेजस गुरव या तिघांना अटक केलेली आहे.या तिघांसाठी पोलिस कोठडीची मागणी करणार असल्याचं तपास अधिकारी महादेव कुंभार यांनी बीबीसी मराठीला सांगितलं. साक्षीदारांचे जबाब नोंदवून घटनास्थळाचा तपास केल्यानंतर या प्रकरणी आरोपपत्र दाखल करण्यात येईल.