क्रिप्टो करन्सीच्या नावाखाली मोठी फसवणूक
जळगाव (प्रतिनिधी):- क्रिप्टो करन्सी ट्रेडिंगमध्ये गुंतवणुकीच्या नावाखाली अमळनेर येथील एका ७० वर्षीय ज्येष्ठ डॉक्टरची तब्बल १ कोटी ६५ लाख ५७ हजार २०४ रुपयांची ऑनलाईन फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी जळगाव सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

अमळनेर येथील यशवंत नगरमधील रहिवासी असलेले ७० वर्षीय डॉ.अनिल नथ्थू शिंदे यांना झासी प्रवीण पाटील नावाच्या महिलेने संपर्क साधला. तिने शिंदे यांचा विश्वास संपादन करून त्यांना ‘क्रिप्टो करन्सी ट्रेडिंग’मध्ये गुंतवणूक केल्यास मोठ्या नफ्याचे आमिष दाखवले. त्यासाठी तिने शिंदे यांना https://solnoy-contract.com ही लिंक पाठवून ‘Solnoy’ नावाचे ॲप डाऊनलोड करण्यास सांगितले.
सुरुवातीला डॉक्टर शिंदे यांनी ७० हजार रुपयांची गुंतवणूक केली. त्यावर त्यांना चक्क १ लाख ५३ हजार २१ रुपयांचा नफा दाखवण्यात आला. हा परतावा मिळाल्याने शिंदे यांचा विश्वास बसला. त्यानंतर आरोपी महिलेने आणि तिच्या साथीदारांनी त्यांना अधिक गुंतवणुकीसाठी प्रवृत्त केले. २९ जानेवारी ते १९ फेब्रुवारी या अवघ्या २१ दिवसांच्या कालावधीत डॉक्टर शिंदे यांनी वेळोवेळी ऑनलाईन पद्धतीने एकूण १,६५,५७,२०४ रुपये गुंतवले. मात्र, एवढी मोठी रक्कम गुंतवल्यानंतर त्यांना कोणताही परतावा मिळाला नाही. आपली आर्थिक फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी जळगाव सायबर पोलीस ठाणे गाठले.
डॉक्टर शिंदे यांच्या फिर्यादीवरून जळगाव सायबर पोलीस ठाण्यात झासी प्रवीण पाटील, तिचे साथीदार, ॲप्लिकेशन चालवणारे आणि संबंधित बँक खातेधारक यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सतीश गोराडे हे करत आहेत. अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.









