करणी सेना महिला आघाडीचा उत्साह
भुसावळ (प्रतिनिधी):- संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती १९ फेब्रुवारी २०२६ रोजी भुसावळ शहरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला टीमच्या वतीने आयोजित या सोहळ्याने शहरात एक वेगळेच नवचैतन्य निर्माण केले होते.

शहरातील महेश नगर येथील मुक्तीधाम परिसरात हा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात शिवरायांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आणि विधिवत पूजन करून करण्यात आली. यावेळी उपस्थित राजपूत समाजातील सर्व महिलांनी शिवरायांच्या कार्याला अभिवादन केले. ‘जय भवानी, जय शिवाजी’च्या घोषणांनी यावेळी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. याप्रसंगी मार्गदर्शन करताना श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या जिल्हा अध्यक्षा सारिकाताई राजपूत यांनी प्रभावी प्रबोधन केले. त्या म्हणाल्या की, “ज्याप्रमाणे राजमाता जिजाऊंनी शिवरायांना लहानपणापासूनच संस्कार देऊन स्वराज्य घडवण्यासाठी तयार केले, त्याचप्रमाणे आजच्या काळात आपल्या समाजातील प्रत्येक स्त्रीने जिजाऊंचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपल्या घराघरात छत्रपती घडवावेत.”
कार्यक्रमाला करणी सेनेच्या जिल्हा सचिव मीनाताई राजपूत, भुसावळ तालुका अध्यक्षा कविताताई राजपूत यांच्यासह श्रद्धा राजपूत, प्रमिला राजपूत, प्रतीक्षा राजपूत, उज्वला राजपूत, भाग्यश्री राजपूत, प्रियंका बोरसे, सपना राजपूत, प्रियंका राजपूत, गायत्री राजपूत, सविता मोरे, सविता पाटील, संगीता पाटील, अर्चना राजपूत, कविता पाटील व असंख्य महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
या सोहळ्यामुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, महिलांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.









