पुढील आठ दिवसात समस्यांचे निरसन करण्याचे आदेश
जळगाव (प्रतिनिधी):- जळगाव शहर महानगरपालिकेच्या महापौर दालनात प्रभाग १३ मधील प्रलंबित प्रश्न आणि तक्रारींबाबत महापौरांच्या उपस्थितीत बुधवारी १८ रोजी विशेष बैठक पार पडली. या बैठकीत नगरसेवकांनी आरोग्य, पाणीपुरवठा आणि पथदिव्यांच्या समस्यांवरून प्रशासकीय अधिकाऱ्यांना धारेवर धरले. “पुढील काळात तक्रारी येता कामा नयेत, अन्यथा कारवाईबाबत विचार केला जाईल,” असा सज्जड दम महापौर दीपमाला काळे यांनी अधिकाऱ्यांना दिला.

बैठकीच्या सुरुवातीला आरोग्य विभागाच्या कामकाजावर नगरसेवकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. नगरसेविका सुरेखा तायडे यांनी घंटागाडीच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “घंटागाडीचे ड्रायव्हर कोण आहेत आणि त्यांचे मार्ग काय आहेत, याची सविस्तर माहिती नगरसेवकांना द्या. सफाई कामगार नियमित येत नाहीत,” अशी तक्रार त्यांनी केली.
वैशाली पाटील यांनी गटारींच्या स्वच्छतेचा मुद्दा मांडला. “गटारी नियमित साफ होत नाहीत आणि काढलेला कचरा तसाच पडून राहतो. महिला कामगार कचरा गोळा करून निघून जातात, पण तो उचलणार कोण?” असा सवाल त्यांनी केला. तर प्रफुल्ल देवकर यांनी आदर्श नगरातील अस्वच्छतेकडे लक्ष वेधले.
यावर सहाय्यक आयुक्त (आरोग्य) उदय पाटील यांनी सांगितले की, प्रभाग १३ मध्ये ७,४१० घरे असून कामगारांची यादी निश्चित आहे. कामात कसूर करणाऱ्यांवर दंड केला जात असून, येत्या ५ दिवसांत अपडेट केलेली यादी लोकप्रतिनिधींना दिली जाईल.
पाणीपुरवठ्याच्या समस्येवरून नितीन सपके म्हणाले, “दौलत नगर, संभाजी नगर, रायसोनी नगर भागात पाणी नियमित मिळत नाही. गौरी हाईट्स परिसरात पाण्याचा दाब (प्रेशर) अत्यंत कमी असतो. आपल्याला लोकांचे प्रश्न कायमस्वरूपी मिटवायचे आहेत,” असे त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले.पाणीपुरवठा अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, दौलत नगर हा भाग उंचावर असल्याने तांत्रिक अडचण येते, ती सोडवण्याचे काम सुरू आहे. तसेच सिंगल कनेक्शन घेतल्यास पाण्याचा फोर्स वाढेल, असेही त्यांनी सुचवले.

पथदिव्यांचा अंधार आणि महापौरांचे निर्देश
काव्यरत्नावली ते महाबळ रस्ता आणि लांडोरखोरी उद्यान परिसरात पथदिवे वारंवार बंद राहत असल्याचा मुद्दाही नितीन सपके यांनी उपस्थित केला. महापौर दीपमाला काळे यांनी बैठकीत अधिकाऱ्यांना कडक सूचना दिल्या. उन्हाळा जवळ येत असल्याने पाण्याचे नियोजन आताच करा. प्रभागातील आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांची नावे व संपर्क क्रमांक नगरसेवकांना तातडीने द्या. पथदिवे वेळेवर सुरू आणि बंद झालेच पाहिजेत. स्वच्छतेच्या बाबतीत कोणतीही दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही.
या बैठकीला प्रभागाचे चारही नगरसेवक स्थायी समिती सदस्य नितीन सपके, नगरसेविका सुरेखा तायडे, वैशाली पाटील, प्रफुल्ल देवकर यांच्यासह पाणीपुरवठा, पथदिवे व आरोग्य विभागाचे सर्व अधिकारी उपस्थित होते.








