महसूल मंत्र्यांचे अधिकाऱ्यांना कडक निर्देश
मुंबई ( वृत्तसेवा ) – “महानुभाव पंथातील प्राचीन तीर्थक्षेत्रांची शासन दप्तरी अधिकृत नोंदणी करण्याची प्रक्रिया कोणत्याही परिस्थितीत येणाऱ्या अधिवेशनापूर्वी पूर्ण झाली पाहिजे,” असे स्पष्ट निर्देश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज दिले. मंत्रालयातील दालनात आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी नोंदणी प्रक्रियेत होत असलेल्या दिरंगाईबद्दल त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघाडणी केली.

बैठकीत प्रामुख्याने नाशिक, नांदेड, सातारा, भंडारा, जळगाव आणि वर्धा या जिल्ह्यांतील नोंदींचा आढावा घेण्यात आला. महानुभाव पंथाची अनेक प्राचीन स्थळे वारसा आणि श्रद्धेच्या दृष्टीने महत्त्वाची आहेत. मात्र, प्रशासकीय स्तरावर त्यांच्या अधिकृत नोंदणीचे काम प्रलंबित असल्याबद्दल मंत्र्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. “भाविकांच्या श्रद्धेचा विषय असलेल्या या कामात चालढकल खपवून घेतली जाणार नाही,” अशा शब्दांत त्यांनी अधिकाऱ्यांना सुनावले.
“महानुभाव पंथाचे विचार आणि कार्य महाराष्ट्राच्या संस्कृतीचा अविभाज्य भाग आहेत. ही प्रक्रिया रखडणे दुर्दैवी आहे. सर्व तांत्रिक आणि प्रशासकीय सोपस्कार पूर्ण करून आगामी अधिवेशनापूर्वी या नोंदी शासन दप्तरी झाल्याच पाहिजेत. यामध्ये हलगर्जीपणा करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल.” असाही इशारा मंत्री बावनकुळे यांनी यावेळी दिला. दरम्यान, संबंधित अधिकाऱ्यांनी नोंदणी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना तातडीने हाती घेतल्या असल्याची माहिती बैठकीत दिली.
या बैठकीला महसूल विभागाचे वरिष्ठ अधिकारी तसेच समन्वयक हरिहर पांडे यांच्यासह महानुभाव पंथाचे प्रतिनिधी उपस्थित होते.









