वनविभागाची धडक कारवाई
यावल (प्रतिनिधी) :- यावल तालुक्यातील वाघझिरा वनकक्षात सागवान लाकूड तोड करून वाहतूक करताना तिघांवर वनविभागाने कारवाई केली. या तीनही तस्करांची न्यायालयाने कोठडीत रवानगी दिली आहे.

नियतक्षेत्र वाघझिरा, ता.यावल येथील वनविभागाच्या कक्ष क्रमांक १४६ मध्ये शनिवार, १४ फेब्रुवारी रोजी वाघझिरा राऊंड स्टाफ सह वनविभागाचे कर्मचारी गस्त घालत असताना साग प्रजातीचे झाडांची तोड करून चौपट तयार करून मोटरसायकलवरून नेतांना त्यांना तिघे दिसले. त्यांनी पाठलाग केल्यानंतर संशयीत आरोपी सुशील केशराम पावरा (रा.चिखली, ता.वरला) आढळला तर अन्य दोघे सागवान चौकट फेकून पसार झाले.
१ हजार ९१४ रुपये किंमतीचे सागवान चौकट जप्त करण्यात आली तर २२ हजार ६५८ रुपयांचे इतके नुकसान केल्याचे आढळून आले. याबाबत वनपाल वाघझिरा यांनी गुन्हा दाखल केला. प्रारंभी आरोपी सुशील केशराम पावरा यास न्यायालयात हजर केले त्यास वन कोठडी १८ फेब्रुवारीपर्यंत देण्यात आली.
तसेच पसार संशयीत संजय गेंदा पावरा (वाघझिरा, ता.यावल) व परशुराम तेरसिंग पावरा (वाघझिरा, ता.यावल) या दोघांना देखील अटक करण्यात आली. संशयीतांना न्यायालयात हजर केले असता दोघांना २७ फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. ही कारवाई वनपाल विपुल पाटील, वनरक्षक हनुमंत सोनवणे, जगदीश बारेला, चेतन शेलार, अशोक राठोड यांनी केली.









