चाळीसगाव शहरात मुलाचे अमानुष कृत्य
चाळीसगाव ( प्रतिनिधी ) – शहरात बाप लेकाच्या नात्याला काळिमा फासणारी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पैशांच्या वादातून एका तरुणाने आपल्या जन्मदात्या वडिलांची निर्घृण हत्या केल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चाळीसगाव शहरातील एम.जी. नगर परिसरात वास्तव्यास असलेले ६८ वर्षीय भिकन राणा मोरे यांचा त्यांचा मुलगा कल्पेश मोरे याने बेदम मारहाण करून खून केल्याचा आरोप आहे. कल्पेश हा गेल्या काही दिवसांपासून नवीन रिक्षा खरेदीसाठी वडिलांकडे पैशांची मागणी करत होता. मात्र घरची परिस्थिती लक्षात घेता वडिलांनी पैसे देण्यास नकार दिल्याने पिता-पुत्रामध्ये वारंवार वाद होत होते. घटनेच्या दिवशी पुन्हा एकदा रिक्षासाठी पैशांवरून दोघांमध्ये जोरदार वाद झाला.
संतापाच्या भरात कल्पेशने घरातील लाकडी काठी आणि कमरेचा पट्टा (बेल्ट) घेऊन वडिलांवर हल्ला केला. वृद्ध भिकन मोरे यांना गंभीर दुखापत झाली आणि ते रक्ताच्या थारोळ्यात कोसळले. शेजाऱ्यांनी आरडाओरड ऐकून धाव घेतली, मात्र तोपर्यंत परिस्थिती हाताबाहेर गेली होती. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. आरोपी मुलाला तात्काळ अटक करण्यात आली असून त्याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू आहे.








