चोपडा तालुक्यातील विरवाडे रस्त्यावरील घटना
चोपडा ( प्रतिनिधी ) – तालुक्यात विरवाडे रस्त्यावर सोमवारी पहाटे झालेल्या भीषण मोटार अपघातात दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य तिघे गंभीर जखमी झाले आहेत. मृत आणि जखमी सर्वजण विरवाडे गावातील रहिवासी असून, या घटनेने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. या प्रकरणी चोपडा शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

राहुल अमृत भोई (वय ३२) आणि मयूर अरुण राजपूत (वय २४) अशी मृतांची नावे आहेत. तर विजय भोई (वय ३५), राकेश राजपूत (वय ३०) आणि बंटी कोळी (वय ३०) हे तिघे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींपैकी विजय भोई यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याने त्याला तातडीने जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात हलविण्यात आले आहे. राकेश राजपूत व बंटी कोळी यांच्या हात आणि पायांना गंभीर दुखापत झाली असून, त्यांच्यावर चोपडा शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, पाचही तरुण गेल्या आठ दिवसांपासून चोपडा शहरात सुरू असलेल्या एका धार्मिक कार्यक्रमात नियमितपणे सहभागी होत होते. सोमवारी या कार्यक्रमाचा शेवटचा दिवस असल्याने नेहमीप्रमाणे पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास ते मोटारीने विरवाडे येथून चोपड्याकडे निघाले होते. पहाटेची वेळ, कमी वर्दळ आणि थंड वातावरण अशा परिस्थितीत वाहनाचा ताबा सुटल्याने हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. विरवाडे-चोपडा रस्त्यावर त्यांची भरधाव मोटार अचानक रस्त्याच्या कडेला जाऊन जोरदार धडक दिली. जोरदार आवाज ऐकून परिसरातील नागरिक घटनास्थळी धावून आले.
अपघाताची तीव्रता इतकी होती की वाहनाचा पुढील भाग पूर्णपणे चक्काचूर झाला होता. भीषण अपघातात राहुल भोई आणि मयूर राजपूत यांचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य तिघे गंभीर जखमी अवस्थेत वाहनात अडकले होते. घटनेची माहिती मिळताच चोपडा शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक मधुकर साळवे यांनी तातडीने पथकासह घटनास्थळी धाव घेतली.
पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमींना बाहेर काढून रुग्णवाहिकेद्वारे रुग्णालयात हलविले. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवून नातेवाइकांना घटनेची माहिती देण्यात आली. या अपघातामुळे विरवाडे गावावर शोककळा पसरली आहे. दोन्ही तरुणांच्या निधनाने त्यांच्या कुटुंबांवर मोठा आघात झाला आहे.









