पोलीस ठाण्यात तक्रार दाखल
जळगाव ( प्रतिनिधी ) – जळगाव तालुक्यातील शिरसोली येथून एक १८ वर्षीय तरुणी कोणालाही काहीही न सांगता घरातून निघून गेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी मुलीचे वडिलांनी पोलीस ठाण्यात मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार दिली आहे.

तक्रारदार हे आपल्या कुटुंबासह शिरसोली येथे वास्तव्यास असून मजुरी करून आपला उदरनिर्वाह करतात. त्यांची मुलगी (वय १८ वर्षे) ही १२ वी उत्तीर्ण झाल्यानंतर घरीच होती. १३ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री सर्व कुटुंबीय जेवण करून झोपले होते. मध्यरात्री ३ वाजेच्या सुमारास तिची आई बाथरूमसाठी उठली असता, मुलगी आपल्या अंथरुणावर दिसून आली नाही.
त्यांनी तात्काळ आजूबाजूला, बस स्थानक, रेल्वे स्टेशन आणि नातेवाइकांकडे शोध घेतला, मात्र तिचा कुठेही पत्ता लागला नाही. अखेर वडिलांनी एमआयडीसी पोलीस स्टेशन गाठून मुलगी बेपत्ता असल्याची माहिती दिली. सदर मुलगी कोणास आढळल्यास किंवा तिची काही माहिती मिळाल्यास तात्काळ स्थानिक पोलीस स्टेशनशी संपर्क साधण्याचे आवाहन एमआयडीसी पोलिसांनी केले आहे.









