जळगाव तालुक्यात नांद्रा येथील घटना
जळगाव ( प्रतिनिधी ) – पत्नीचे गावातीलच एका तरुणाशी असलेल्या प्रेमसंबंधांमुळे आणि त्यातून होणाऱ्या वारंवार मानसिक त्रासामुळे नैराश्यात आलेल्या एका ३८ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना जळगाव तालुक्यातील नांद्रे येथे घडली आहे. या प्रकरणी जळगाव तालुका पोलीस स्टेशनमध्ये मृत तरुणाच्या आईच्या फिर्यादीवरून पत्नीसह एकूण ७ जणांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मृत सुरेश हिरामण बाविस्कर (वय ३८, रा. नांद्रे बु।।, ता. जि. जळगाव) याची पत्नी सोनी हिचे गावातीलच मोहन विलास सपकाळे याच्याशी प्रेमसंबंध होते. या कारणावरून गेल्या काही महिन्यांपासून बाविस्कर कुटुंबात सातत्याने वाद होत होते. सुरेश याने पत्नीला समजावण्याचा प्रयत्न केला असता, संशयित आरोपींनी त्याला उलट धमकी दिली होती. दि. ७ फेब्रुवारी रोजी एका लग्नसमारंभात आरोपींनी सुरेशच्या मुलाला मारहाण केली होती. त्यानंतर १४ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी, शेतात काम करत असताना संशयित आरोपींनी सुरेशला गाठून पत्नीबद्दल अपशब्द बोलून अश्लील शिवीगाळ केली आणि हातपाय तोडण्याची धमकी दिली. सततच्या अपमानामुळे आणि मानसिक त्रासामुळे खचलेल्या सुरेशने १४ फेब्रुवारी रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास घरातून निघून जाऊन गावातीलच एका शेतात झाडाला गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास ही घटना उघडकीस आली.
मृत सुरेशच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून जळगाव तालुका पोलिसांनी सात जणांवर गुन्हा दाखल केला आहे. यात सोनी सुरेश बाविस्कर (पत्नी), मोहन विलास सपकाळे, विशाल कैलास कोळी, भारती पंढरीनाथ तायडे, ईश्वर पंढरीनाथ तायडे, जया गणेश सपकाळे, गणेश विजय कोळी यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. जळगाव तालुका पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत असून, या घटनेमुळे नांद्रे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.









