जळगाव महाबळ परिसरातील घटना
जळगाव ( प्रतिनिधी ) – शहरात शनिवारी १४ फेब्रुवारी रोजी रात्रीच्या सुमारास महाबळ कॉलनीतील एका भाजीपाल्याच्या दुकानाला अचानक आग लागल्याची घटना घडली. या आगीत दुकानातील फर्निचर, फ्रीजसह सर्व माल जळून खाक झाला असून मोठे आर्थिक नुकसान मध्यमवर्गीय विक्रेत्याचे झाले आहे.

महाबळ कॉलनीतील नवजीवन दुकानाच्या समोर किरण महाजन यांचे भाजीपाल्याचे दुकान आहे. शनिवारी रात्री १०:५० च्या सुमारास या दुकानातून धूर आणि आगीच्या ज्वाळा निघताना दिसल्या. घटनेचे गांभीर्य ओळखून किशोर चावरे यांनी तातडीने अग्निशमन दलाला याबद्दल माहिती दिली. आग एवढी भीषण होती की काही वेळातच दुकानातील सर्व साहित्याने पेट घेतला. यामध्ये प्रामुख्याने भाजीपाला (बटाटे व इतर पालेभाज्या), दुकानातील फर्निचर, डीप फ्रीज, प्लास्टिक कॅरेट आणि इतर साहित्य असे या आगीत संपूर्ण माल जळून खाक झाला आहे. सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या ५८५७, ५८६० आणि ५८६१ अशा तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. जवानांनी पाण्याचा मारा करून काही वेळातच आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवले, ज्यामुळे शेजारील इतर दुकानांना आगीची झळ बसली नाही.
मदत कार्यात वाहनचालक देविदास सुरवाडे, मयूर ओतारी, प्रभाकर पाटील, फायरमन व पथक: रोहिदास चौधरी, वृषभ सुरवाडे, यश मनोरे, चेतन सपकाळे, ऋषिकेश जाधव, गणेश महाजन, तेजस बडगुजर, सौरभ चिकटे, भूषण पाटील, मयूर पाटील आणि रजनीश भावसार या सर्व कर्मचाऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न करून आग विझवली. आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही, मात्र या घटनेमुळे किरण महाजन या मध्यमवर्गीय विक्रेत्याचे मोठे नुकसान झाले आहे.









