अमळनेर पोलीस स्टेशनची कामगिरी
अमळनेर ( प्रतिनिधी ) – वृद्ध महिलांना आपल्या बोलण्यात गुंगवून आणि विविध बतावणी करून त्यांचे दागिने लंपास करणाऱ्या एका भामट्या महिलेला अमळनेर पोलिसांनी शिताफीने अटक केली आहे. अटक करण्यात आलेली महिला चोपडा तालुक्यातील वटार येथील रहिवासी आहे.

सिंधुबाई संतोष चव्हाण (वय ७६, रा. अजंदे, ता. शिंदखेडा) ह्या ३१ जानेवारी रोजी जळगावला जाण्यासाठी दुपारी १२ वाजेच्या सुमारास अमळनेर येथे पोहोचल्या होत्या. त्यावेळी एक अनोळखी महिला त्यांच्याजवळ आली आणि तिने त्यांना जबरदस्तीने फुटाणे खायला दिले. त्यानंतर ती महिला शंभर रुपयांची मागणी करत सिंधुबाईंच्या मागे फिरू लागली. बोलण्यात गुंतवून त्या महिलेने सिंधुबाईंना बसस्थानकाबाहेरील एका मेडिकल स्टोअरवर नेले.
तिथे तिने “तुझी माळ खूप छान आहे, मला फोटो काढण्यासाठी दे” अशी गळ सिंधुबाईंना घातली. विश्वासाने सिंधुबाईंनी आपली सोन्याची माळ तिला दिली. मात्र, फोटो काढण्याच्या बहाण्याने माळ घेऊन गेलेली ती महिला पुन्हा परतलीच नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच सिंधुबाईंनी अमळनेर पोलीस स्टेशन गाठले.गुन्हा दाखल होताच पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी तपास पथकाला आरोपीचा शोध घेण्याचे आदेश दिले.
पोलीस उपनिरीक्षक शरद काकळीज, हेडकॉन्स्टेबल मिलिंद सोनार, विनोद संदानशिव आणि निलेश मोरे यांच्या पथकाने तांत्रिक विश्लेषण आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची कसून तपासणी केली. तपासाअंती ही महिला वटार (ता. चोपडा) येथील आशाबाई बाळू तायडे (वय ६३) असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी १३ फेब्रुवारी रोजी तिला ताब्यात घेऊन अटक केली आहे. या कारवाईमुळे वृद्ध महिलांना लक्ष्य करणाऱ्या टोळीचा किंवा अशा गुन्हेगारांचा पर्दाफाश होण्यास मदत झाली आहे.









