हरिविठ्ठल नगरमधील घटना
जळगाव (प्रतिनिधी) :- शहरातील हरिविठ्ठल नगर परिसरात पैशांच्या मागणीवरून झालेल्या वादात एका तरुणावर लोखंडी चाकूने जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. या हल्ल्यात भीकन सुरेश चौधरी (वय ३७) हे गंभीर जखमी झाले असून, रामानंद नगर पोलीस ठाण्यात एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी भीकन चौधरी हे दि.१० फेब्रुवारी रोजी सकाळी १०:१० वाजेच्या सुमारास आपल्या परिसरात असताना संशयित आरोपी ललित सुभाष इंगळे (रा. हरिविठ्ठल नगर) याने त्यांना अडवून पैशांची मागणी केली. भीकन यांनी पैसे देण्यास नकार दिला, ज्याचा राग मनात धरून आरोपीने त्यांना अश्लील शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. पैसे न मिळाल्याने चिडलेल्या ललितने आधी फिर्यादीला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर “तुला जिवंत सोडणार नाही” अशी धमकी देत आपल्या जवळील लोखंडी चाकूने भीकन यांच्या डोक्यावर जोरदार प्रहार केला. या हल्ल्यात फिर्यादींच्या डोक्याला गंभीर इजा झाली असून ते जखमी झाले आहेत.
या प्रकरणी फिर्यादीने दिलेल्या तक्रारीवरून १२ फेब्रुवारी रोजी रात्री उशिरा रामानंद नगर पोलीस ठाण्यात आरोपी ललित इंगळे याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल प्रवीण वसंत जगदाळे करत आहेत. भरदिवसा झालेल्या या चाकू हल्ल्यामुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.









