अमळनेर तालुक्यात दहिंवद येथे चोरट्यांचा धुमाकूळ
अमळनेर (प्रतिनिधी):- अमळनेर तालुक्यातील दहिंवद येथे चोरट्यांनी एकाच रात्री दोन बंद घरे फोडून आणि अंगणात उभी केलेली दुचाकी चोरून नेत पोलिसांना आव्हान दिले आहे. याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून परिसरात घबराटीचे वातावरण आहे.

दहिंवद येथील रहिवासी कल्पेश गोकुळ माळी (वय ३२) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. १० फेब्रुवारीच्या रात्री १० ते ११ फेब्रुवारीच्या सकाळी ७ वाजेच्या दरम्यान ही घटना घडली. चोरट्यांनी कल्पेश माळी यांच्या मावशी भिकूबाई सुकलाल माळी आणि गावातीलच प्रतिभाबाई जयवंत भदाणे यांची बंद घरे लक्ष्य केली.चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि घरातील सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम असा एकूण ६८,००० रुपयांचा मुद्देमाल लंपास केला.
केवळ घरफोडीवरच न थांबता, चोरट्यांनी गावातील महेंद्र भिका माळी यांच्या मालकीची त्यांच्या घरासमोर उभी केलेली दुचाकी देखील चोरून नेली. एकाच रात्री झालेल्या या तीन चोरीच्या घटनांमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे सावट पसरले आहे. या घटनेची माहिती मिळताच अमळनेर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. फिर्यादी कल्पेश माळी यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस हेड कॉन्स्टेबल विजय भाई हे या प्रकरणाचा तपास करत आहेत.









