रावेर पोलिसांत गुन्हा दाखल
रावेर (प्रतिनिधी):- ग्राहकांकडून मालाची वसुली करण्यासाठी नेमलेल्या २ विश्वासू कर्मचाऱ्यांनीच मालकाची तब्बल ८ लाख ५ हजार ६३० रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


बऱ्हाणपूर (मध्य प्रदेश) येथील ड्रायफ्रूट आणि गरम मसाल्याचे व्यापारी दीपक सुरेश धरमानी (वय २८) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांचे दोन कर्मचारी त्यांच्या दुकानातील मालाची ग्राहकांकडून वसुली करण्याचे काम करत होते. मात्र, दि. ६ जुलै २०२२ पासून ते ७ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत आरोपींनी ग्राहकांकडून जमा केलेली वसुली मालकाकडे जमा न करता स्वतःच्या फायद्यासाठी वापरली.
संशयित आरोपींची नावे गौरव कैलास वाघ (रा. पन्नाशाही नगर, लोधीपुरा, बऱ्हाणपूर), मोहम्मद तौफिक रफीक तेली (रा. लोहार मंडी, बऱ्हाणपूर) अशी आहेत. व्यापाऱ्याने दिलेल्या फिर्यादीवरून रावेर पोलिसांनी दोन्ही आरोपींविरुद्ध ‘फौजदारी विश्वासघात’ आणि संगनमताने फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल सुनील वंजारी करत आहेत.









