यावल तालुक्यात पाडळसा येथील घटना
यावल (प्रतिनिधी):- कृषी उत्पन्न बाजार समितीचे टोकन देण्यासाठी गेलेल्या कर्मचाऱ्याला, मालाची गाडी भरण्याबाबत विचारणा केल्याचा राग आल्याने तिघांनी मिळून बेदम मारहाण केल्याची घटना पाडळसा येथे घडली. या प्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


फिर्यादी दिगंबर गजानन चौधरी (वय ४२, रा. गांधी चौक, सावदा), जे कृषी उत्पन्न बाजार समिती यावल येथे नोकरीला आहेत, ते ५ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री ९:१५ वाजेच्या सुमारास पाडळसा येथील बाळू रुपचंद तेली यांच्या धान्य गोदामासमोर टोकन देण्यासाठी गेले होते. यावेळी चौधरी यांनी संशयित आरोपींना विचारले की, “ट्रान्सपोर्टची गाडी कुठे आहे? आम्हाला न विचारता तुम्ही परस्पर गाडी कशी भरून घेता?” या साध्या विचारणेचा राग संशयित आरोपींना आला.
रागाच्या भरात बाळू रुपचंद तेली याने फिर्यादीला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर ज्ञानेश्वर बाळू तेली आणि सागर रवींद्र तायडे यांनी चौधरी यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. हल्ला एवढ्यावरच थांबला नाही; ज्ञानेश्वर तेली याने फिर्यादीच्या तोंडावर बुक्का मारून त्यांच्या नाकाला दुखापत केली, तर हातातील लाकडी काठीने त्यांच्या दोन्ही पायांवर प्रहार करून गंभीर जखमी केले. “पुन्हा इकडे आलास तर तुला पाहून घेऊ,” अशी धमकीही यावेळी संशयित आरोपींनी दिली.
या प्रकरणी दिगंबर चौधरी यांनी ७ फेब्रुवारी रोजी फैजपूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सपोनि रामेश्वर मोताळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ विकास सोनवणे पुढील तपास करत आहेत.









