प्रोफेसर कॉलनी परिसरातील घटना
जळगाव ( प्रतिनिधी ) – शहरातील उच्चभ्रू वस्ती मानल्या जाणाऱ्या प्रोफेसर कॉलनी परिसरातील आय.एम.आर. कॉलेजजवळून चोरट्यांनी ८ लाख रुपये किमतीची टाटा नेक्सॉन कार चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली असून जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


फिर्यादी प्रदीप जगतसिंग पाटील (वय ६१, रा. रामबाग कॉलनी, प्रोफेसर कॉलनी जवळ, जळगाव) हे सेवानिवृत्त असून त्यांनी आपली पांढऱ्या रंगाची टाटा नेक्सॉन (क्र. एमएच-१९-डीव्ही-७७९०) ही कार ३ फेब्रुवारीच्या रात्री १२ वाजेच्या सुमारास राहत्या घरासमोर पार्क केली होती.
दुसऱ्या दिवशी, म्हणजेच ४ फेब्रुवारीच्या सकाळी ८ वाजेच्या सुमारास त्यांना आपली कार जागेवर दिसून आली नाही. अज्ञात चोरट्याने मध्यरात्रीच्या सुमारास घरासमोर उभी असलेली ही कार संधी साधून चोरून नेली.
पाटील यांनी कारचा शोध घेतला असता ती मिळून आली नाही, अखेर त्यांनी ७ फेब्रुवारी २०२६ रोजी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक अनिल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी मिलिंद सोनवणे करत आहेत. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्यांचा माग काढला जात आहे.









