जळगावात भाविकांची मांदियाळी
जळगाव ( प्रतिनिधी ) – येथील इंद्रप्रस्थ नगरमधील ‘योगिराज श्री गजानन महाराज बहुउदेशीय संस्था’ (केशरबाग) यांच्या वतीने शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज यांच्या १४८ व्या प्रगटदिन महोत्सवाचा मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला आहे. ५ ते ८ फेब्रुवारी या कालावधीत चालणाऱ्या या महोत्सवात धार्मिक आणि अध्यात्मिक कार्यक्रमांची रेलचेल पाहायला मिळत आहे. पहिल्या दिवशी पारायण आणि महाशिवपुराण कथेला प्रारंभ झाला आहे.



महोत्सवाच्या पहिल्या टप्प्यात सामूहिक ग्रंथ पारायण वाचनाला सुरुवात झाली. यामध्ये रूपा योगेंद्र पवार व दिपाली कुलकर्णी या पारायण वाचक म्हणून सेवा बजावत आहेत. सायंकाळी ह.भ.प. देवदत्त महाराज मोरदेकर यांच्या रसाळ वाणीतून ‘भव्य श्री शिवमहापुराण कथा’ सुरू झाली आहे. कथेच्या पहिल्या दिवशी महाराजांनी शिवपंचाक्षरी मंत्र आणि मौनव्रताचे महत्त्व विशद केले.

कथेतील महत्त्वाचे विचार
शिव ही अनादी देवता असून, विश्वाची उत्पत्ती ब्रह्मदेवांनी, संगोपन विष्णूंनी तर संतुलन भगवान शिव करतात. अन्नाचा कण आणि संतांचा क्षण जीवनात अत्यंत महत्त्वाचा आहे,असे सांगत महाराजांनी अन्नाची नासाडी टाळण्याचे आवाहन केले. जेवताना शेतकऱ्यांचे कष्ट डोळ्यासमोर ठेवावेत, असेही त्यांनी आवर्जून सांगितले. सत्य, दया, दान आणि तप ही खऱ्या धर्माची लक्षणे आहेत.
या सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी संस्थेचे अध्यक्ष संतोष बापूराव चव्हाण, सचिव गणेश शेळके व विश्वस्त प्रवीण पाटील परिश्रम घेत आहेत. महिला भाविकांच्या व्यवस्थेची जबाबदारी छाया पाटील, हर्षा भोसले, प्रिया थोरवे, सुरेखा चव्हाण आणि वैशाली पाटील सांभाळत आहेत. या सर्व कार्यक्रमांचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.
पुढील कार्यक्रम
५ ते ७ फेब्रुवारी: दुपारी २ ते ५ सामूहिक पारायण; सायंकाळी ६ ते १० शिवमहापुराण कथा.
८ फेब्रुवारी (रविवार): सकाळी ६ वाजता रुद्राभिषेक, होम-हवन आणि महाआरती.
महाप्रसाद: रविवारी दुपारी १२ ते २ वाजेपर्यंत.
पालखी सोहळा: रविवारी सायंकाळी ४ वाजता भव्य पालखी मिरवणूक व दीपोत्सव.









