पिंप्राळा परिसरात पोलिसांचा घटनास्थळी तगडा बंदोबस्त
जळगाव प्रतिनिधी : शहरात १ फेब्रुवारी रोजी पिंप्राळा परिसरातील प्रशांत पाटील चौकात झालेल्या किरकोळ वादातून एका २१ वर्षीय तरुणाला करण्यात आलेल्या निर्घृण मारहाणीचा अंत अत्यंत दुर्दैवी झाला आहे. गंभीर जखमी असलेला तरुण शुभम गजानन सपकाळे याचा मुंबईतील जे.जे. रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेनंतर पिंप्राळा परिसरात शोककळा पसरली असून संताप व्यक्त केला जात आहे.


१ फेब्रुवारी २०२६ च्या रात्री १०:३० वाजेच्या सुमारास शुभम सपकाळे हा सार्वजनिक रस्त्यावरून जात असताना, संशयित आरोपींनी त्याला अडवले. काहीही ठोस कारण नसताना विशाल भिका सोनवणे, चंद्रकांत उर्फ बाळा कोळी, यश प्रदीप पाटील (बाँड) आणि धीरज कोळी यांनी संगनमत करून शुभमला लाथाबुक्क्यांनी आणि लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली होती. या हल्ल्यात शुभमच्या डोक्याला आणि पाठीला गंभीर दुखापत झाली होती.
रामानंदनगर पोलीस ठाण्यात यापूर्वीच भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता शुभमच्या मृत्यूनंतर या गुन्ह्यात ‘कलम १०३’ (खून) वाढवण्याची प्रक्रिया पोलीस करत आहेत. शुभमचा मृत्यू झाल्याची बातमी समजताच पिंप्राळा परिसरात तणाव निर्माण झाला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे, पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पिंप्राळा आणि शुभमच्या निवासस्थानी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
शुभमचा मृतदेह उद्या शुक्रवारी सकाळी १० ते ११ वाजेच्या दरम्यान जळगावात आणला जाण्याची शक्यता आहे. त्यानंतर त्याच्यावर अंत्यसंस्कार केले जातील. या प्रकरणात दोन जणांना अटक केली आहे. तर दोन जण फरार आहे. तरी पोलीस पथके आरोपींच्या मागावर आहेत. पोलीस हेड कॉन्स्टेबल योगेश माळी या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. एका निष्पाप तरुणाचा अशा प्रकारे बळी गेल्याने जळगावात गुन्हेगारांविरुद्ध कठोर कारवाईची मागणी होत आहे.








