जळगाव आरटीओ कार्यालयात फसवणूक
जळगाव ( प्रतिनिधी ) – प्रादेशिक परिवहन कार्यालय, जळगाव येथे बनावट कागदपत्रे आणि डमी व्यक्ती उभी करून वाहन हस्तांतरण करत शासनाची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


जळगाव आरटीओ कार्यालयात वाहन क्रमांक एमएच १९ ईजे ८०५५ च्या हस्तांतरणाची प्रक्रिया सुरू होती. यावेळी आरोपींनी मूळ वाहन मालकाच्या नावे बनावट आधार कार्ड आणि पॅन कार्ड तयार केले. इतकेच नव्हे तर, एका डमी (तोतया) व्यक्तीला वाहन मालक म्हणून उभे केले आणि वरिष्ठ लिपिकांकडून स्वाक्षरी साक्षांकित करून घेतली.
याशिवाय, आरोपींनी ऑनलाईन प्रणालीमध्ये मोबाईल क्रमांक अपडेट करून आणि बँकेचे बनावट ना-हरकत प्रमाणपत्र सादर करून कार्यालयाची दिशाभूल केली. हा सर्व प्रकार लक्षात आल्यानंतर दीपक शिवाजीराव ठाकरे (वय ४६, रा. नवनाथ नगर) यांनी तक्रार दिली.
पोलिसांनी या प्रकरणी शिवलाल ब्रिजलाल पाटील (रा. मुक्ताईनगर),अक्षय सोनवणे (रा. जळगाव), दोन अनोळखी इसम यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास रामानंदनगर पोलीस ठाण्याचे सपोनि संदीप पाटील करत आहेत. संशयित आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा सर्व प्रकार ७ जानेवारी ते ४ फेब्रुवारी च्या दरम्यान घडला असून, पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत.









