रावेर शहराजवळ भीषण अपघात
रावेर ( प्रतिनिधी ) – शहराजवळ बिजासनी माता मंदिराजवळ आज बुधवारी दुपारी झालेल्या भीषण अपघातात २ मोटरसायकलींच्या समोरासमोर धडकेत दोन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या हृदयद्रावक घटनेमुळे रावेर तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात असून परिसरात शोककळा पसरली आहे.


शहराजवळील बिजासनी माता मंदिराजवळ आज दुपारी हा भीषण अपघात घडला. विनय भालेराव (वय २६) हा आपल्या दुचाकीवरून रावेरच्या दिशेने येत होता, तर शुभम लोखंडे (वय २०) हा रावेरहून विवराकडे जात असताना दोघांच्या मोटरसायकलींची समोरासमोर जोरदार धडक झाली. धडक इतकी भीषण होती की शुभम लोखंडे याचा जागीच मृत्यू झाला. अपघातात गंभीर जखमी झालेल्या विनय भालेराव याला तातडीने उपचारासाठी भुसावळ येथे हलविण्यात येत होते.
मात्र, उपचारासाठी नेत असतानाच रस्त्यात त्याचा देखील मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेमुळे दोन्ही कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात शोकाकुल वातावरण आहे. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तात्काळ मदतीसाठी धाव घेतली. घटनेची माहिती मिळताच रावेर पोलिस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. दोन्ही मृतदेह रावेर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले असून या प्रकरणी रावेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.









