पाचोरा तालुक्यात नराधमाविरुद्ध गुन्हा दाखल
पाचोरा (प्रतिनिधी):- पोटच्या चिमुकल्या मुलीला जीवे मारण्याची आणि बदनामी करण्याची धमकी देऊन एका २३ वर्षीय विवाहितेवर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना पाचोरा येथे उघडकीस आली आहे. या प्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात संशयित आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


पीडित २३ वर्षीय महिला हिला संशयित आरोपी बाळू काळू राठोड (रा. कु-हाड तांडा, ता. पाचोरा) याने गाठले. आरोपीने पीडितेच्या मुलीला तिच्यापासून हिरावून घेतले आणि “तुझ्या मुलीचे काहीतरी बरे-वाईट करेन” अशी धमकी दिली. या धाकाखाली त्याने पीडितेवर पाचोरा येथील एका हॉटेलमध्ये नेऊन जबरदस्तीने शरीरसंबंध ठेवले. इतक्यावरच न थांबता, आरोपीने पीडितेला पुन्हा धमकावले की, “जर तू माझ्यासोबत आली नाहीस, तर मी तुझी बदनामी करेन आणि तुझ्या मुलीला संपवून टाकेन.” या भीतीपोटी पीडितेला त्याने अहिल्यानगर (अहमदनगर) जिल्ह्यातील मिरजगाव येथील ‘श्रीमंत हॉटेल’वर नेले आणि तिथेही तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.
या त्रासाला कंटाळून अखेर पीडितेने पाचोरा पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली. या तक्रारीवरून आरोपी बाळू काळू राठोड याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाचोरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक योगेश गणगे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.









