जळगाव एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई
जळगाव ( प्रतिनिधी ) – शहरात वाढत्या वाहन चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी जळगाव एमआयडीसी पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. काशीनाथ चौक परिसरातून चोरीला गेलेली दुचाकी शोधण्यात पोलिसांना यश आले असून, या प्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.


धानोरा खुर्द येथील रहिवासी शालिक पाटील हे काही दिवसांपूर्वी कामानिमित्त जळगाव शहरातील काशीनाथ चौक भागात आले होते. त्यांनी आपली हिरोहोंडा सुपर स्पेंडर (एमएच १९ एके २०७) ही दुचाकी उभी केली आणि सामान घेण्यासाठी गेले. मात्र, परत आल्यावर त्यांना आपली दुचाकी चोरीला गेल्याचे लक्षात आले. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
एमआयडीसी पोलिसांनी गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे तपास चक्रावली. यावल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मदतीने पोलिसांनी आतिष जितेंद्र पोथीवाल (रा. कांचन नगर, जळगाव) याला ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवताच त्याने आपला साथीदार गणेश लक्ष्मण कोळी (रा. साकेगाव, भुसावळ) याच्या मदतीने ही चोरी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी दोन्ही आरोपींकडून चोरीला गेलेली दुचाकी (एमएच १९ एके ०२०७) हस्तगत केली आहे. आरोपींना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसी पोलीस निरीक्षक बबन आव्हाड आणि त्यांच्या शोध पथकाने राहुल तायडे, चंद्रकांत धनके, प्रमोद लाडवंजारी, गिरीश पाटील, प्रदीप चौधरी, गणेश ठाकरे, राहुल घेटे, योगेश घुगे यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.
पुढील तपास पोलीस नाईक प्रदीप चौधरी आणि योगेश घुगे करत आहेत.









