पाचोरा तालुक्यातील घटना
पाचोरा (प्रतिनिधी):- माहितीचा अधिकार मागे घेण्याच्या कारणावरून पिंप्री खुर्द येथे एका ४५ वर्षीय शेतकऱ्याला बेदम मारहाण केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. याप्रकरणी पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्यात एकाच कुटुंबातील महिलांसह ९ जणांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


पिंप्री खुर्द येथील रहिवासी भागवत बंडू पाटील (वय ४५) हे शनिवार, ३१ जानेवारी रोजी सकाळी ८:३० वाजेच्या सुमारास गावातील ग्रामपंचायत कार्यालयाशेजारी असलेल्या हनुमान मंदिर आणि स्वामी समर्थ मंदिरात दर्शन घेऊन बाहेर येत होते. यावेळी संशयित आरोपींनी त्यांना अडवले. “तू माहितीचा अधिकार का मागे घेत नाहीस? तू आमचे ऐकले नाहीस,” असे म्हणत संशयित आरोपींनी फिर्यादी भागवत पाटील यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि नऊ जणांनी मिळून त्यांना चापटबुक्क्यांनी बेदम मारहाण केली.
तसेच, यापुढे माहितीचा अधिकार वापरल्यास “जीवे ठार मारू”, अशी धमकीही आरोपींनी दिली. फिर्यादी भागवत पाटील यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी संशयित आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. यात अमोल दादाराव बाविस्कर, दादाराव गंगाराम बाविस्कर, रमेश गंगाराम बाविस्कर, पोपट गंगाराम बाविस्कर, भुरा रमेश बाविस्कर, प्रवीण दादाराव बाविस्कर, सुनंदाबाई दादाराव बाविस्कर, गुणाबाई गंगाराम बाविस्कर, मथुराबाई रमेश बाविस्कर (सर्व रा. पिंप्री खुर्द, ता. पाचोरा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
या प्रकरणाचा तपास पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकारी कल्याणी वर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली सफौ हिरालाल पाटील करत आहेत. पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली आहे. .









