गटनेते, उप गटनेते, प्रतोद यांच्याकडून महायुतीसाठी तर सेनेकडून मनोज चौधरींनी घेतले अर्ज ताब्यात
जळगाव (प्रतिनिधी) : येथील महानगरपालिकेच्या महापौर व उप महापौरपदासाठी भाजपकडून प्रत्येकी ६ असे १२ अर्ज शुक्रवारी अंतिम दिवशी दि. ३० जानेवारी रोजी ताब्यात घेण्यात आले आहे. तर सेनेकडूनही महापौर पदासाठी २, उप महापौर पदासाठी २ असे ४ अर्ज घेण्यात आले. आता २ फेब्रुवारी रोजी कोण अर्ज भरणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून आहे.

जळगाव शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपने ४६ तर शिवसेना शिंदे गटाने २२ जागांवर यश मिळविले. त्यांना राष्ट्रवादी अजित पवार गट व अपक्ष असे मिळून आता महायुतीचे ७० संख्याबळ झाले आहे. त्यामुळे महापौर हा भाजपचा व उप महापौर हे शिवसेनेचा होणार हे सूत्र निश्चित झाले आहे. गेल्या दोन दिवसांपासून महापौर व उपमहापौर साठी एकही अर्ज घेण्यात आला नव्हता. मात्र अंतिम दिवशी शुक्रवारी दि. ३० रोजी भाजपचे शहर सरचिटणीस विशाल त्रिपाठी यांच्यासह गटनेते प्रकाश बालाणी, उप गटनेते नितीन बरडे, प्रतोद डॉ. चंद्रशेखर पाटील हे मनपात दुपारी सव्वा बारा वाजता दाखल झाले.
नगर सचिव सतिश शुक्ला यांच्याकडून प्रकाश बालाणी यांनी महापौर पदासाठी ४ फॉर्म घेतले. नितीन बरडे यांनी उपमहापौर पदासाठी ४ फॉर्म घेतले. तर प्रतोद डॉ. चंद्रशेखर पाटील यांनी २ फॉर्म घेतले. याप्रकारे १० अर्ज महापौर पदासाठी घेण्यात आले. तर डॉ. चंद्रशेखर पाटील यांनी उपमहापौर पदासाठीदेखील दोन फॉर्म घेतले. आम्ही महायुतीकडून १२ अर्ज घेतल्याची माहिती गटनेते, उप गटनेत्यांकडून देण्यात आली आहे. तर शिवसेना शिंदे गटाकडून चौथ्यांदा निवडून आलेले नगरसेवक मनोज सुरेश चौधरी यांनी महापालिकेत १२.३० ला दाखल झाले. त्यांनी महापौर पदासाठी २ तर उप महापौर पदासाठी २ अर्ज घेतले आहे. आता उमेदवारी अर्ज कोण भरते याकडे लक्ष लागून आहे.









