जामनेर तालुक्यातील तोंडापूर येथील घटना
जळगाव (प्रतिनिधी): देशभरात २६ जानेवारीचा उत्साह साजरा होत असतानाच, जामनेर तालुक्यातील तोंडापूर येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. कर्ज कसे फेडावे, या विवंचनेतून एका ३३ वर्षीय तरुण शेतमजुराने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. नितीन लक्ष्मण कोळी असे या दुर्दैवी तरुणाचे नाव असून, या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

नितीन कोळी यांनी ट्रॅक्टर आणि इतर व्यावसायिक कामांसाठी कर्ज घेतले होते.(केसीएन)मात्र, गेल्या काही दिवसांपासून हे कर्ज कसे फेडायचे, या विवंचनेत ते सतत असायचे. याच नैराश्यातून त्यांनी २६ जानेवारी २०२६ रोजी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास राहत्या घरी विषारी औषध प्राशन केले.
विष प्राशन केल्याचे लक्षात येताच कुटुंबीयांनी त्यांना तातडीने जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले.(केसीएन)तेथील अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, काळाला काही वेगळेच मान्य होते. मंगळवारी २७ जानेवारी रोजी संध्याकाळी पाच वाजेच्या सुमारास उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
मयत नितीन कोळी यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा मोठा परिवार आहे. घराचा कर्ता पुरुष गेल्याने कोळी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या प्रकरणी पहूर पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरू होते.









