नाशिक, धुळे, अहिल्यानगर, जळगावसाठी ६ तर मालेगावसाठी ७ फेब्रुवारीला निवडणूक; विभागीय आयुक्तांचे आदेश
जळगाव (प्रतिनिधी) – उत्तर महाराष्ट्रातील नाशिकसह धुळे, अहिल्यानगर, जळगाव आणि मालेगाव या पाच महत्त्वाच्या महानगरपालिकांच्या महापौर आणि उपमहापौर निवडीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे.

विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी या संदर्भात विशेष बैठकीचे निर्देश दिले असून, फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात या शहरांना नवीन कारभारी मिळणार आहेत. विभागीय आयुक्तांनी दिलेल्या आदेशानुसार, नाशिक, धुळे, अहिल्यानगर आणि जळगाव महानगरपालिकेची विशेष बैठक ६ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ११ वाजता होणार आहे. तर मालेगाव महानगरपालिकेसाठी ७ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ११ वाजता ही प्रक्रिया पार पडेल.
निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी संबंधित जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांची ‘पीठासीन अधिकारी’ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ही संपूर्ण प्रक्रिया ‘महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९’ मधील तरतुदींनुसार पार पडेल. नवनिर्वाचित सदस्यांमधून महापौर आणि उपमहापौर यांची निवड गुप्त किंवा हात उंचावून (नियमनानुसार) केली जाईल. बैठकीचे इतिवृत्त नोंदवून त्याचा सविस्तर अहवाल विभागीय आयुक्तांकडे सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
नाशिक आणि मालेगाव या दोन्ही महापालिकांच्या निवडीसाठी नाशिकचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद हेच पीठासीन अधिकारी म्हणून जबाबदारी सांभाळणार आहेत.








