फायटरने मारहाण केल्याने तरुण जखमी
बोदवड (प्रतिनिधी): ग्रामसभेत झालेल्या वादाचे रूपांतर हाणामारीत होऊन एका तरुणाला लोखंडी फायटरने मारहाण करून जखमी केल्याची खळबळजनक घटना राजूर ता. बोदवड येथे घडली आहे. या प्रकरणी राजूरचे सरपंच प्रमोद गोविंद शेळके यांच्यासह पाच जणांविरुद्ध बोदवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

२६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त राजूर ग्रामपंचायत कार्यालयाच्या पटांगणात ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेदरम्यान वासुदेव अंबरसिंग जाट आणि त्यांचे बंधू जीवन अंबरसिंग जाट यांचा गावातील विषयावरून वाद झाला. या वादाचे पर्यवसान हाणामारीत झाले. फिर्यादी वासुदेव जाट यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, सरपंच प्रमोद गोविंद शेळके यांनी शिवीगाळ करत मारहाण करण्याची चिथावणी दिली. त्यानंतर तुषार धनराज शेळके याने आपल्या हातातील लोखंडी फायटरने जीवन जाट यांच्या चेहऱ्यावर जोरात प्रहार केला.
या हल्ल्यात जीवन यांच्या उजव्या डोळ्याच्या भुवईजवळ गंभीर दुखापत होऊन रक्तस्त्राव झाला. फिर्यादी वासुदेव जाट यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी संशयितांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. प्रमोद गोविंद शेळके (सरपंच), तुषार धनराज शेळके, धनराज पंढरी शेळके, अक्षय प्रमोद शेळके, दिपक अरुण शेळके यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मारहाणीसोबतच संशयितांनी फिर्यादी आणि त्यांच्या भावाला लाथाबुक्क्यांनी मारहाण करत शिवीगाळ केली व ‘जीवे ठार मारू’ अशी धमकी दिल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. बोदवड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरविंद भोळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गजानन रहाटे व तपास अंमलदार संतोष जगन्नाथ चौधरी या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.









