मुंबई (वृत्तसंस्था) – देशात लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्याच्या काळात करोनाच्या प्रमाणात कुठेही घट होताना दिसत नाही. उलट सार्वजनिक ठिकाणी गर्दी वाढतच आहे. अशातच गर्दी झाल्यास पुन्हा एकदा टाळेबंद करावे लागेल, असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला होता. यानंतर १५ जूननंपासून लॉकडाऊन कडक होणार असल्याच्या अफवा सोशल मीडियावर पसरल्या आहेत. मात्र यासंदर्भात आता मुख्यमंत्री कार्यालयाकडून ट्विटरद्वारे स्पष्टीकरण देण्यात आले आहे.
लॉकडाऊन पुन्हा जाहीर केलेला नाही. मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी जनतेला विनंती व आवाहन केले आहे की कुठेही गर्दी करू नका. शासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करा आणि स्वतःची काळजी घ्या, असे ट्विट मुख्यमंत्री कार्यालयाने केले आहे.
दरम्यान, आपला करोनाविरुद्धचा लढा अजून संपलेला नाही, तो सुरूच असून सतर्क राहून घाई-गडबड आणि गर्दी न करता आपल्याला सार्वजनिक ठिकाणी वावरावे लागेल. सार्वजनिक सेवा अद्यापही सुरु केलेल्या नाहीत. सरकार एकूण परिस्थितीचा अंदाज घेत आहे. पण जर ही उघडीप जीवघेणी ठरते आहे असं लक्षात आलं तर नाइलाजाने आपल्याला पुन्हा लॉकडाउन करावा लागेल, असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला होता.